गुजरातच्या जांभळाची बाजारात चलती; मार्केट यार्डात आवक वाढली | पुढारी

गुजरातच्या जांभळाची बाजारात चलती; मार्केट यार्डात आवक वाढली

पुणे : पुढारी वृत्तसेवा: गोड चवीचे, मधुमेह रोगावर गुणकारी असलेले जांभूळ म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा जांभळाची मार्केटयार्डातील फळविभागात आवक वाढली आहे.गुजरात येथील बडोदा, अहमदाबादचा काही भाग, कर्नाटक आणि कोकणातील सावंतवाडी, मालवण भागातून मार्केट यार्डातील फळ विभागात ही आवक होत असल्याची माहिती जांभळाचे व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी दिली.

यावर्षी नेहमीच्या तुलनेत सुमारे 20 दिवस जांभळाची आवक उशिराने सुरू झाली आहे. येथील बाजारात दररोज गुजरात येथून 5 ते 6 टन, कर्नाटक येथून 8 ते 10 टन आणि कोकणातून सुमारे 2 टन आवक होत आहे. गुजरात, कर्नाटक आणि कोकण जांभळाला घाऊक बाजारात दर्जानुसार अनुक्रमे 80 ते 180 रुपये, 60 ते 150 आणि 60 ते 120 रुपये भाव मिळत आहे.

किरकोळ बाजारात 200 ते 300 रुपये किलो भावाने जांभळाची विक्री होत आहे. आणखी महिना ते दीड महिना जांभळाचा हंगाम सुरू राहणार आहे. गुजरातच्या जांभळाविषयी सुपेकर म्हणाले, ‘गुजरातचे जांभुळाला अधिक गर असतो. इतर जांभळापेक्षा हे जांभूळ अधिक गोड, आकाराने मोठे आणि दिसायला आकर्षक असते. त्यामुळे या जांभळाला नागरिकांकडून जास्त मागणी असते. परिणामी, त्याची बाजारात चांगली चलती आहे. खरेदीदार ते मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. तरीही इतर जांभळाचीही चांगली विक्री होत आहे.

हेही वाचा

गोवा : मराठी राजभाषा आंदोलनापासून ‘गोसासे’ दूर का?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पडले सायकलवरून

विधान परिषद निवडणूक : भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात : एकनाथ खडसे

Back to top button