इंद्राणी मुखर्जींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीआयला नोटीस | पुढारी

इंद्राणी मुखर्जींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीआयला नोटीस

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी यांच्या जामिन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.१८) रोजी ‘सीबीआय’ ला नोटीस बजावत उत्तर मागवून घेतले आहे. सीबीआय विशेष न्यायालयाच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या इंद्राणी यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वीच मुखर्जी यांचा जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

ऑगस्ट २०१५ मध्ये इंद्राणी मुखर्जी यांना अटक करण्यात आल्यानंतर त्या भायखळा येथील महिलांच्या तुरूंगात कैद आहेत. यापूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अनेकदा त्यांचा जामिन अर्ज फेटाळला आहे. २०१२ पासून सीबीआय याप्रकरणाचा तपास करीत आहे.

इंद्राणी यांच्यावर त्यांची मुलगी शीना बोरा यांच्या हत्येचा आरोप आहे. २४ एप्रिल २०१२ पासून त्यांच्यावर यासंबंधी खटला सुरू आहे. शीना यांची गळा आवळून हत्या करून तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील एका जंगलात पुरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शीना बोरा यांचे अवशेष देखील मिळाल्याचा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे.

याच दरम्यान जानेवारी महिन्यात इंद्राणी यांच्या वकिलांनी सीबीआय संचालकांना पत्र लिहून शीना जिवंत असल्याचा दावा केला आहे. काश्मीरमध्ये शीनाचा शोध घेण्याची विनंती या पत्रातून इंद्राणी यांच्याकडून करण्यात आली होती. तर लसीकरणादरम्यान एका सरकारी अधिकाऱ्याने शीना यांना श्रीनगरमध्ये पाहिले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button