

पुणे : पुढारी वृत्तसेवा
बीएमडब्ल्यू इंडियाची नवीन इलेक्ट्रिक कार MINI Cooper SE ही 24 फेब्रुवारी रोजी भारतात लॉन्च होणार आहे. लॉन्च होण्यापूर्वीच या कारचे सर्व 30 युनिट्स विकले गेले आहेत.
बीएमडब्ल्यू इंडियाने iX इलेक्ट्रिक एसयूव्हीसह भारतीय बाजारपेठेच्या ईव्ही स्पेसमध्ये प्रवेश केला आहे आणि आता कंपनी 24 फेब्रुवारी रोजी नवीन 3 दरवाजे असलेली इलेक्ट्रिक मिनी कूपर एसई लॉन्च करणार आहे. कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये 1 लाख रुपयांच्या टोकन रकमेसह या कारचे बुकिंग सुरू केले होते. मिनीने पहिल्या लॉटमध्ये कारचे फक्त 30 युनिट्स बुकिंगसाठी ठेवले होते आणि हे सर्व 30 युनिट्स लॉन्च होण्यापूर्वीच विकले देखील गेले आहेत.
मिनीचे डिझाईन आकर्षक तर आहेच, तसेच तिच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटला तीन दरवाजे आहेत. इलेक्ट्रिक कारला एलईडी डिआरएल (दिवसा वापरल्या जाणाऱ्या लाईटस्) सह सिग्नेचर गोल आकाराचे हेडलॅम्प आणि नवीन 1 इंच स्क्वेअर डिझाइन अलॉय व्हील आणि एलईडी टेललाइट्स देण्यात आले आहेत. कारच्या केबिनमध्ये 8.8 इंचाची टचस्क्रीन सिस्टिम, नपा लेदरचे सिटस् आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरही असणार आहे.
नवीन मिनी इलेक्ट्रिक कूपरमध्ये अनेक हायटेक वैशिष्ट्ये असणार आहेत. याकारमध्ये 32.6 kW बॅटरी पॅक आहे जी 181 BHP पॉवर आणि 270 Nm पीक टॉर्क बनवते. ही कार अतिशय वेगवान ईव्ही असल्याने केवळ 7.3 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग घेऊ शकते. तर पूर्ण चार्ज केल्यावर 270 किमीपर्यंत धाऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. ही इलेक्ट्रिक कार 11 kW आणि 50 kW चार्जरने चार्ज केली जाऊ शकते. 11 kW चार्जरने कारची बॅटरी 2.5 तासात तर 50 kW च्या चार्जरने 35 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.