Hamida Banu : भारतातील पहिली महिला पैलवान हमीदा बानो कोण होती?; जिने मोठ्या मल्लांना धूळ चारली; गुगलने बनवले तिचे खास डूडल | पुढारी

Hamida Banu : भारतातील पहिली महिला पैलवान हमीदा बानो कोण होती?; जिने मोठ्या मल्लांना धूळ चारली; गुगलने बनवले तिचे खास डूडल

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची पहिली महिला पैलवान हमीदा बानूचे गुगलने आज (दि.५) डूडल बनवले आहे. बानू ही एक भारतीय महिला कुस्तीपटू होती. तिने १९४० आणि ५० च्या दशकात कुस्तीच्या पुरुष-प्रधान खेळात प्रवेश करण्यासाठी अनेक अडथळे पार केले. भारतातील पहिली महिला कुस्तीपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बानूचा प्रवास उल्लेखनीय होता, तिने धाडसी आव्हानांचा सामना केला. जाणून घेऊया कोण होती हमीदा बानू…

Hamida Banu
Hamida Banu

कुस्ती हा खेळ भारतात नेहमीच प्रसिद्ध राहिला आहे. आज ऑलिम्पिकपासून जवळपास प्रत्येक मोठ्या स्पर्धेत भारताला कुस्तीत पदके मिळाली आहेत. पण पूर्वी हा फक्त पुरुषांचा खेळ मानला जात होता. महिला कुस्ती करत नसतं. स्त्रिया कुस्ती करू शकतात याचा विचारही कोणी केला नाही. त्यावेळी उत्तर प्रदेश येथील हमीदा बानोने कुस्तीमध्ये आपले नाव कोरले. तिला भारतातील पहिली महिला कुस्तीपटू देखील मानले जाते. कुस्तीच्या लढतीत तिच्यापुढे एक पुरूष पैलवानही उभा राहू शकला नाही.

तिला हरवणाऱ्या पुरुषाशी करणार होती लग्न

हमीदा बानोने १९४० आणि १९५० च्या दशकात पुरुषांना आव्हान दिले होते की, जो कोणी तिला कुस्तीमध्ये पराभूत करू शकेल त्याच्याशी ती लग्न करेल. हमीदाला खरी ओळख मिळवून देणारा पहिला कुस्ती सामना १९३७ मध्ये लाहोरच्या फिरोज खानशी झाला. त्या सामन्यात हमीदाने फिरोजचा पराभव केला. यानंतर हमीदा खूप प्रसिद्ध झाली. हे खानसाठी आश्चर्यकारक होते. त्यानंतर तिने कोलकाता येथील खरग सिंग या शीख आणि आणखी एका कुस्तीपटूचा पराभव केला. या दोघांना हमीदासोबत लग्न करण्याचे आव्हान दिले होते.

डाएट ऐकून व्हाल थक्क…!

यूपीच्या मिर्झापूरमध्ये जन्मलेल्या हमीदा बानोचा आहार ऐकुन थक्क व्हाल. रिपोर्ट्सनुसार, हमीदा बानोची उंची ५ फूट ३ इंच होती आणि तिचे वजन १०७ किलो होते. असे म्हटले जाते की ती दररोज ६ लिटर दूध, १.२५ किलो सूप आणि २.२५ लिटर फळांचा रस प्यायची. यासोबत ती एक कोंबडा, एक किलो मटण, ४५० ग्रॅम बटर, ६ अंडी, सुमारे एक किलो बदाम, २ मोठ्या रोट्या आणि २ प्लेट बिर्याणी खात होती. २४ तासांपैकी ती ९ तास झोपायची, ६ तास व्यायाम करायची आणि बाकी वेळ जेवायची.

प्रशिक्षकानेच हात-पाय मोडले

तेव्हा लोकांना वाटत होते की हमीदा डमी पैलवानाच्या विरोधात जाऊन जिंकेल. मात्र लोकांचा संभ्रम दूर झाला. हमीदाने १९५४ मध्ये रशियाच्या वीरा चेस्टेलिनला एका मिनिटापेक्षा कमी वेळेत पराभूत करून सर्वांना थक्क केले. छोटे गामा नावाच्या प्रसिद्ध कुस्तीपटूने शेवटच्या क्षणी हमीदाशी लढण्यास नकार दिला होता. वीराला पराभूत केल्यानंतर हमीदाने युरोपला जाऊन लढण्याचा निर्णय घेतला. इथून तिच्या करिअरचा आलेख खाली घसरू लागला. हमीदा बानोचे प्रशिक्षक सलाम पैलवान यांना तिने युरोपला जावे असे वाटत नव्हते. रागाच्या भरात सलामने हमीदाला काठीने मारून तिचे हातपाय मोडले. यानंतर ती कुस्तीच्या आखाड्यातून कायमची दूर गेली. पुढे तिने दूध विकून घर चालवले.

हेही वाचा : 

Back to top button