चंद्रपूर: जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींत ‘महाविकास आघाडी’चे नगराध्यक्ष! | पुढारी

चंद्रपूर: जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींत 'महाविकास आघाडी'चे नगराध्यक्ष!

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या काल गुरुवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. केवळ एका नगरपंचायतीवर भाजपला झेंडा फडकविता आला आहे. कोरपना, सिंदेवाही आणि सावलीमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली आहे. जिवतीत राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेसने एकत्र येवून सत्ता स्थापन केली आहे. गोंडपिपरीत काँग्रेसला शिवसेनेची साथ घ्यावी लागली आहे. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

१७ सदस्यीय कोरपना नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले . भाजपचे चार आणि शेतकरी संघटनेचा एक असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसचा उमेदवार कोरपन्याचा प्रथम नागरिक होईल, असे चित्र स्पष्ट असतानाही भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार रिंगणात उतरविले. परंतु अपेक्षेप्रमाणे त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. काँग्रेसच्या नंदाताई बावणे नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून इस्माईल रसूल शेख विजय झाले. या दोघांनाही प्रत्येकी १२ मते मिळाले. बावणे आणि शेख यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या भाजपच्या वर्षा लांडगे आणि आशा झाडे यांना प्रत्येकी पाच मतांवर समाधान मानावे लागले. यानिमित्ताने कोरपना शहराच्या राजकारणात बावणे परिवाराने पुन्हा आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले.

पोंभुर्णा नगरपंचायतच्या अध्यक्षपदी भाजपच्या सुलभा पिपरे निवडून आल्या. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या रामेश्वरी वासलवार यांचा पराभव केला. पिपरे यांनी दहा तर वासलवार यांना सात मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतसुद्धा १० विरुद्ध सात असेच चित्र राहिले. भापजचे अजित मंगळगिरीवार यांनी बहुजन वंचित आघाडीच्या रिना उराडे यांचा उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव केला. या नगरपंचायतमध्ये भाजपचे दहा, सेना चार, बहुजन वंचित आघाडीचे दोन आणि काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आले आहे.

सिंदेवाहीतसुद्धा काँग्रेसचे उमेदवार अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडून आले. अध्यक्षपदी स्वप्नील कावळे आणि उपाध्यक्ष म्हणून मयुर सूचक विजय झाले. कावळे यांच्याविरोधात भाजपचे किशोर भरडकर मैदानात होते. काँग्रेसचे १३ आणि अपक्ष एक असे एकूण १४ नगरसेवकांनी हात उंचावून कावळे यांना पाठिंबा दिला. भाजपच्या तीन नगरसेवकांचा पाठिंबा भरडकर यांना मिळाला. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मयूर सूचक यांना १४ मते मिळाली. त्यांच्या विरोधातील भाजपचे दीपा पुस्तोडे यांना तीन मतांवर समाधान मानावे लागले.

जिवती नगरपंचायतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे . या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी सहा उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता आडे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, तर काँग्रेसचे डॉ. अंकुश गोतावळे उपाध्यक्षपदी विराजमान झाले. या दोघांनाही प्रत्येकी पाच मते मिळाली. गोंडवना गणतंत्र पक्षाने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लक्ष्मीबाई जुमनाके यांना मैदानात उतरविले. त्यांना केवळ पाच मतांवर समाधान मानावे लागले.

गोंडपिपरी नगरपंचायतीवर काँग्रेस- शिवसेना आघाडीची सत्ता आली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या सविता कुळमेथे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सारिका मडावी निवडून आल्या. १७ सदस्यीय या नगरपंचायतीत सात काँग्रेस, चार भाजप, दोन सेना, दोन राष्ट्रवादी व दोन अपक्ष उमेदवार निवडून आले. शिवसेना व अपक्षांनी काँग्रेसला साथ दिली. काँग्रेसच्या उमेदवार सविता कुळमेथे यांना अकरा तर भाजप उमेदवार मनीषा मडावी यांना सहा मत मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही उमेदवारांनी भाजपच्या पारड्यात मते टाकली, परंतु त्याचा भाजपला काहीच लाभ झाला नाही. सावली नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या लता वाकडे अध्यक्ष तर संदीप पुण्यपकार यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाली. या नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला १७ पैकी १४ जागा मिळाल्या आहे.

Back to top button