धुळे : भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरेंच्या घराबाहेर काँग्रेसचे निषेध आंदोलन | पुढारी

धुळे : भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरेंच्या घराबाहेर काँग्रेसचे निषेध आंदोलन

धुळे पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राला बदनाम करीत आहेत. त्यांनी यासाठी माफी मागावी अशी मागणी करीत आज काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या घरासमोर निषेध आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी न मागितल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, माजी आमदार डी. एस. अहिरे, प्राध्यापक शरद पाटील, प्रमोद सिसोदे, रमेश श्रीखंडे, अशोक सुडके, नगरसेवक साबीर शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी शामकांत सनेर यांनी भारतीय जनता पार्टीवर कठोर शब्दात टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या अस्मिते विरोधात अपमानजनक वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज व संतांची भूमी आहे. मात्र कोरोना संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केलेले वाक्य हे महाराष्ट्राची बदनामी करणारे आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. त्यांच्या या वाक्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात सर्व खासदारांच्या घरासमोर जाऊन निषेध आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्र ही देश आणि जगाला दिशा देणारी भूमी आहे. याच भूमीला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. कोरोना काळात महाराष्ट्र शासनाने सर्व स्तरावर चांगली कामगिरी केलेली असताना भारतीय जनता पार्टीचे लोक विनाकारण टीका करून सरकारची देखील बदनामी करीत असल्याचे सनेर यावेळी म्हणाले.

कोरोना काळात मोठे संकट आले होते. त्याच वेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे देण्याऐवजी देशाच्या पी एम केअर मध्ये पैसे जमा करण्याचे आवाहन भाजपच्या काही लोकांनी केले. यातून असे आवाहन करणारे लोक महाराष्ट्र विरोधी असल्याचे दिसून येते आहे. यासंदर्भात भाजपच्या नेतृत्वाने तातडीने माफी न मागितल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button