चंद्रपूर : ट्रक-दुचाकी अपघातात विद्यार्थी ठार; शिक्षेकेसह एक विद्यार्थी गंभीर | पुढारी

चंद्रपूर : ट्रक-दुचाकी अपघातात विद्यार्थी ठार; शिक्षेकेसह एक विद्यार्थी गंभीर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दोन शाळकरी मुलांसह शाळेत जात असलेल्या शिक्षकेच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून एक विद्यार्थी जागीच ठार झाला तर शिक्षिकेसह अन्य एक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. नागभीड तळोधी (बा.) मार्गावरील चिंधीचक बसस्टॉपजवळ आज (दि.५) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. अनिकेत विठोबा शेंडे (वय १२ वर्ष, रा. चिंधीमाल) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

चिधिमाल येथील अनिकेत शेंडे (वय १२) व कुणाल वलधरे (वय १५) हे विद्यार्थी प्रशांत विद्यालय किटाळी (बो.) येथे शिक्षण घेतात. येथील शिक्षिका अश्विनी बाबाराव पाटील या दोघांनाही नियमित शाळेत घेऊन जातात. आज (शुक्रवारी ) नेहमीप्रमाणे दोन्ही मुलांना शाळेत घेऊन जात असताना चिंधिचक बसस्टॉपवरून किटाळी (बोर) कडे वळण घेत असताना नागभिड कडून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून फरफटत नेल्याने अनिकेत शेंडे याचा जागीच मृत्यू झाला. तर शिक्षिकेसह कुणाल हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपूरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, नागभिडचे ठाणेदार विजय राठोड, तळोधीचे ठाणेदार अजितसिंग देवरे घटनास्थळी ताफ्यासह दाखल झाले. बराचवेळ वाहतूक खोळंबली होती. दोन्ही जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. शाळेमध्ये जाण्यास निघालेल्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने चिंधीमाल गावात शोककळा पसरली आहे.

Back to top button