वर्धा नदीत पाच तरुण बुडाले, तिघांचा मृत्यू | पुढारी

वर्धा नदीत पाच तरुण बुडाले, तिघांचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  वर्धा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या पाच तरूण बुडाले. यातील दोन तरूण सुखरुप आहेत तर तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये संकेत पुंडलिक नगराळे (वय28)रा. वणी, अनिरुद्ध चाफले (वय 23), हरी चाफले (वय 16) रा. विठ्ठलवाडी (वणी) अशी मृतांची नावे आहेत. सोबत असलेले दोघे जण बचावले आहे. हि घटना आज शुक्रवारी (8 मार्च) महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

भद्रावती तालुक्यातील माजरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटाळा येथील वर्धा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी सायंकाळच्या सुमारास पाच तरुण गेले होते. वणी तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील पुंडलिक नगराळे (वय28),अनिरुद्ध चाफले (वय 23), हरी चाफले (वय 16) यांचा नदी पात्रात आंघोळ करीत असताना बुडून मृत्यू झाला. तर दोन जण थोडक्यात बचावले. जल समाधी मिळालेल्या तिन्ही तरूणांचे मृतदेह मिळालेले नव्हते. सदर घटनेची माहिती माजरी व वणी पोलिसांना देण्यात आली. दोन्ही ठिकाणचे पोलिसांनी घटनास्थळी येऊन नदीपात्रात मृतदेहाचा शोध मोहीम सुरू केली होती.

माजरीचे ठाणेदार योगेश खरसान यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त वणी येथील एकूण अकरा भटाळी येथे दर्शनाकरीता आले होते. परत जात असताना पाटाळा येथील वर्धा नदी पात्रात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाच तरूण आंघोळीसाठी उतरले. खोल पाण्याचा अंदाज चुकल्याने तिघांना जलसमाधी मिळाली. तर दोघे बाहेर पडले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. संकेत पुंडलिक नगराळे हा वणी येथील तर अनिरुद्ध चाफले व हरी चाफले हे विठ्ठलवाडी (वणी) येथील रहिवासी होते. मृतकामध्ये अनिरुद्ध चाफले आणि हरी चाफले हे चुलत भाऊ आहेत. माजरी व वणी पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

Back to top button