Buldhana News: दारूसाठी बाप बनला निर्दयी! झोपलेल्या मुलावर घातले कुऱ्हाडीचे घाव | पुढारी

Buldhana News: दारूसाठी बाप बनला निर्दयी! झोपलेल्या मुलावर घातले कुऱ्हाडीचे घाव

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे आज (दि.१४) सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झोपेत असलेल्या मुलाच्या गळ्यावर कु-हाडीचे घाव घालून जन्मदात्याने निर्दयीपणे त्याचा खून केला. या प्रकरणी संशयित आरोपी प्रल्हाद रायपूरे (वय ६५) याला अटक केली आहे. या घटनेमुळे आसलगाव येथे खळबळ उडाली आहे. Buldhana News

जळगाव जामोद पोलिसांनी दिलेली माहिती अशीकी, आसलगाव येथील शिवाजी रायपूरे (वय ३३) याने स्वतःला जखमी करून घेतल्याने तो मृत झाला आहे. असे भासविण्यात आले. परंतु, या घटनेचे कारण अनाकलनीय वाटल्याने पोलीस ठाणेदार आनंद महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आणि मृताच्या मानेवर असलेल्या जखमा या त्याने स्वतः करणे अशक्य वाटल्याने पोलिसांचा संशय बळावला. यावेळी श्वानपथक व फिंगर प्रिंट पथकही पाचारण करण्यात आले. Buldhana News

दरम्यान, या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी मृत शिवाजी रायपुरे याचे आईवडील व जवळच्या नातेवाईकांची सखोल विचारपूस केली. शिवाजी व त्याचे वडील प्रल्हाद रायपुरे या दोघांत बुधवारी रात्री शाब्दिक चकमक झाली होती. वडिलांना दारू पिण्यास मुलगा शिवाजी हा विरोध करत होता. दारू पिणार असाल, तर घरात राहू नका, असे शिवाजीने बजाविल्याने रात्रीच वडील कपड्यांची पिशवी घेऊन बाहेर गेले होते. रात्री जेवणानंतर शिवाजी हा त्याच्या खोलीत झोपला होता. बाजूच्या खोलीत त्याची आई नातवंडांसह झोपली होती.

सकाळी त्याच्या आईला शिवाजी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. सुरूवातीला शिवाजीने स्वत: जीवन संपवले, अशी वार्ता पसरली. पण पोलिसांच्या नजरेने वडिलांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या आणि त्यांनाच फैलावर घेऊन विचारपूस केली असता आपला मुलगा शिवाजी हा दारू पिण्यास विरोध करून वाद घालायचा. त्यामुळे बुधवारी रात्री उशीरा १ वाजता तो झोपेत असताना त्याच्या गळ्यावर कु-हाडीचे घाव घालून खून केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button