नागपूर : वाहतूक पोलीसाला फरफटत नेले ( व्हिडीओ व्हायरल ) | पुढारी

नागपूर : वाहतूक पोलीसाला फरफटत नेले ( व्हिडीओ व्हायरल )

नागपूर, पुढारी वृत्तसेवा

वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई सुरू असताना, एका कारचालकाने वाहतूक शाखेच्या पोलिसाला ५० फुटांपर्यंत फरफटत नेले. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ सोशल मीडियावरव्हायरल झाल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.ही खळबळजनक घटना रामदास पेठेतील कॅनल रोडवर घडली. या घटनेने परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

हरीश शंकर भुजाडे (रा. इतवारी) असे कारचालकाचे नाव आहे. हरीश हा ( एमएच-३१-सीपी-९५९४) कारने जात होता. कारमध्ये दोन महिलाही होत्या. ताो त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेवून जात असताना, मॉरिस कॉलेज टी पॉइंट चौकात त्याने सिग्नल तोडला.त्यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस शिपाई सागर हिवराळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारचा पाठलाग केला. कार पंचशील चौकात थांबवली. हिवराळे हे कारचे छायाचित्र काढण्यासाठी गेले असता हरीश याने कारचा वेग वाढवला.

हिवराळे यांनी कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र, हरीशने कार थांबविली नाही. हिवराळे कारच्या बोनेटवर चढले. हरीशने त्‍यांना सुमारे ५० फुटापर्यंत त्यांना फरफटत नेले. त्या ठिकाणी नागरिक जमा झाल्याने त्‍याने कार थांबवली. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.या घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. वाहतूक पोलिस व चालकाला कारसह पोलिस स्टेशनमध्ये आणले. दरम्यान, या घटनेची चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल झाली. वाहतूक पोलिसांनी कार चालकाकडून दंड आकारला असून, घडलेल्या प्रकाराबाबत त्याने पोलिस कर्मचाऱ्याची लेखी माफी मागितल्याने हे प्रकरण निवळल्याचे सीताबर्डी पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

Back to top button