विदर्भ साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर | पुढारी

विदर्भ साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

विदर्भ साहित्य संघातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविधस्वरूपी वाङ् मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाचा शतक महोत्सव सुरू होत असल्यामुळे यावर्षी नेहमीच्या पुरस्कारांशिवाय काही विशेष पुरस्कारही देण्यात येणार आहेत. १ ऑगस्ट २०२० ते ३१ जुलै २०२१ या काळात प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा या पुरस्कारांसाठी विचार करण्यात आलेला आहे.

पुरस्कारासाठी निवडण्यात आलेली पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत. पु. ल. देशपांडे स्मृती कादंबरी लेखन ‘मळण’साठी (रामराव अनिरुध्द झुंजारे), अण्णासाहेब खापर्डे स्मृती लेखन पुरस्कार ‘फौजी’साठी (सुजला शनवारे- देसाई), कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार ‘अरुण कोलटकर ह्यांची स्त्री दु:खाची कविता’साठी (डॉ. सुरेश वर्धे), शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती कविता लेखन पुरस्कार ‘मुठीतील वाळू’साठी (डॉ.अजय चिकाटे), वा. कृ. चोरघडे स्मृती कथालेखन पुरस्कार ‘वऱ्हाडातली बिऱ्हाडं’साठी (रुस्तम होनाळे), डॉ. मा. गो. देशमुख स्मृती साहित्य शास्त्र लेखन पुरस्कार ‘सरस्वती: प्रवाह आणि प्रतीक’ साठी (डॉ. मनोहर नरांजे), वा. ना. देशपांडे स्मृती ललित लेखन पुरस्कार ‘वर्तनाचे परीघ’साठी (मनीषा अतुल), नाना जोग स्मृती नाट्य लेखन पुरस्कार ‘दोन नाटके’साठी (वर्षा विजय देशपांडे), बा. रा. मोडक स्मृती बालवाडःमय पुरस्कार ‘पिलांटू’साठी (डॉ.विद्याधर बन्सोड), नवोदित साहित्य लेखन पुरस्कार ‘मी संदर्भ पोखरतोय’साठी (पावन नालट) आणि ‘मनातलं’साठी ( विद्या काणे) यांना जाहीर करण्यात आला आहे.

‘युगवाणी’तील सर्वोत्कृष्ट समीक्षालेखनासाठी देण्यात येणारा कविवर्य ग्रेस पुरस्कार ‘कमल देसाई: सिंहावलोकन’साठी (संजय आर्वीकर) जाहीर झाला असून, यावर्षी शतक महोत्सवाच्या निमित्ताने देण्यात येणारे विशेष शताब्दी पुरस्कार पुढीलप्रमाणे :  सेक्सोफोन…( गणेश कनाटे), उन्हात घर माझे ( नितीन भट), मनस्विनी (अर्चना देव) आणि ‘कृष्णद्वैपायन वेदव्यास महर्षि’ (डॉ. भारती सुदामे). तर पत्रकारितेसाठी देण्यात येणारा स्व. हरिकिशन अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्कार मंदार मोरोणे यांना जाहीर झाला आहे.

दिवाळी अंकातील सर्वोत्कृष्ट कथेसाठी देण्यात येणारा कथाकार शांताराम कथा पुरस्कार यावर्षी ‘अक्षरधारा’ या दिवाळी अंकातील ‘देव करो’ या किरण येले यांच्या कथेसाठी जाहीर झाला आहे. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप रोख रुपये पाच हजार आणि स्मृतिचिन्ह असे असून दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या ९९ व्या वर्धापन दिनी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

हेही वाचलं का ?

Back to top button