कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ /सर्किट बेंच स्थापन हाेण्यासाठी येत्या १५ दिवसांत केंद्रीय कायदा मंत्री यांच्याकडे सकारात्मक पाठपुरावा करून दिल्ली येथे खंडपीठ कृती समिती व केंद्रीय कायदा मंत्री यांची एकत्रित बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांनी आज दिले. कोल्हापूर दौऱ्यावर आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी कृती समितीचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके व सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख यांनी सांगितले की, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी काेल्हापूरात खंडपीठ अथवा सर्किट बेंच स्थापन व्हावे, याकरिता गेली 35 वर्षे प्रदीर्घ लढा सुरु आहे. कोल्हापुर हे 6 जिल्ह्यांकरिता मध्यवर्ती ठिकाण आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करणेबाबत राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तरीही खंडपीठ स्थापनेचा विषय अद्याप प्रलंबित आहे.
नुकतेच पश्चिम बंगाल येथील जलपाईगुडी येथे सर्किट बेंच स्थापन झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथेही सहा जिल्ह्यांकरिता खंडपीठ स्थापन होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. यावेळी राणे म्हणाले की, कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन होण्याबाबतची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे लवकरात लवकर मी स्वतः लोकप्रतिनिधी या नात्याने केंद्रीय कायदा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणारआहे. येत्या पंधरा दिवसात केंद्रीय कायदा मंत्री व खंडपीठ कृती समिती यांची एकत्रित बैठक दिल्ली येथे आयोजित केली जाईल, असेही आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे कोल्हापूर जिल्हा बार असो. चे माजी अध्यक्ष ॲड. शिवाजीराव राणे, अजितराव मोहिते, व्ही. आर. पाटील, इंद्रजीत चव्हाण, रविंद्र जानकर, संकेत सावर्डेकर, तृप्ती नलवडे, सुशांत चेंडके, प्रमोद दाभाडे आदी हजर होते.
हेही वाचले का ?