बंदीजण-मुलाबाळांच्या गळाभेटीने मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीना फुटला पाझर; अमरावतीत महाराष्ट्र दिनानिमित्त उपक्रम | पुढारी

बंदीजण-मुलाबाळांच्या गळाभेटीने मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीना फुटला पाझर; अमरावतीत महाराष्ट्र दिनानिमित्त उपक्रम

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: कारागृह म्हटलं की, शिक्षा भोगत असलेले बंदीजण आपल्या डोळ्यापुढे येतात. कित्येक वर्ष शिक्षा भोगत असताना बंदीजण हे कुटुंबापासून तुटलेले असतात. त्यांच्यात कौटुंबिक जिव्हाळा वाढावा, म्हणून महाराष्ट्र दिनी बुधवारी (दि.१) अमरावती येथील मध्यवर्ती जिल्हा कारागृहात गळाभेटीचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांची त्यांच्या मुलांसोबत गळाभेट घडवून आणण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात बंदीजन शिक्षा भोगत आहेत. शिक्षा होऊन कुटुंबापासून दूर असलेल्या बंदीजनांसाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आल्याने याचे कौतुक होत आहे. शिक्षा भोगत असताना बंदीजण हे निराशेच्या गर्तेत जाऊ नये. त्यांच्यात सकारात्मकता आणि आपल्या कुटुंबाप्रती आपुलकी राहावी. मुलाबाळांपासून फार दूर असलेल्या बंदीजनांना त्यांना भेटता यावे, जवळून पाहता यावे. त्यांच्यात कौटुंबिक जिव्हाळा वाढावा, त्यांच्यात सुधारणा व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविला गेला. आपल्या मुलाबाळांना कित्येक वर्षानंतर पाहिल्याने अनेक बंदीजनांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.
तर आपल्या वडिलांना भेटता आल्याने लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील द्विगुणीत झाला होता. जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या वतीने बंदीजण आणि त्यांच्या परिवारातील सदस्य व लहान मुलांकरिता नाष्टा व जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. महाराष्ट्र दिनी बंदीजनांसाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविल्याने अनेकांनी प्रशासनाचे आभार मानले. लवकरच शिक्षा पूर्ण करून कारागृहातून आपल्या कुटुंबात जावे, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली.
दरम्यान, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बंदी जणांच्या 18 वर्षाखालील मुलांची गळाभेट आम्ही घडवून आणली. कारागृहाचे ब्रीद वाक्य सुधारणा आणि पुनर्वसन असल्यामुळे हा उद्देश पूर्ण व्हावा, यासाठी हा गळाभेट उपक्रम राबविल्याचे कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी सांगितले.
हेही वाचा 

Back to top button