वाशीम : भावी आमदारांची रणरणत्या उन्हात लग्न मंडपात हजेरी | पुढारी

वाशीम : भावी आमदारांची रणरणत्या उन्हात लग्न मंडपात हजेरी

वाशीम, पुढारी वृत्तसेवा : वाशीम जिल्ह्यात सध्या लग्नाची धूम सुरु आहे. लग्न सराईच्या हंगामात वधू व वराकडील जेवणावळीत मोठ्या प्रमाणात जमलेल्या नागरिकांच्या भेटीगाठी अधिक परिश्रम न करता होत असल्याने विविध क्षेत्रात कार्यरत असलेले व वाशीम – मंगरुळपीर, कारंजा – मानोरा, रिसोड – मालेगाव अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवून असलेल्या भावी आमदार खेडोपाडी व शहरात दिसत असल्याने नागरिकांच्या भुवया आतापासून उंचवायला लागलेल्या आहेत.

जागतिक महामारी मुळे २०२०-२१ आणि २२ या वर्षात जीवित्वाच्या धोक्याने विवाह समारंभ म्हणून साजरे करण्यास प्रतिबंध होते. संसर्गजन्य असलेल्या महामारीचा प्रभाव ओसरताच यावर्षी जिल्ह्यामध्ये लग्नाची मोठी धूम पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धामध्ये सुद्धा लग्नाचे कॅलेंडर व्यस्त असून या तिन्ही विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा उराशी बाळगून असणारे आणि विविध पक्षांमध्ये कार्यरत असलेले व पक्षात नसूनही चळवळीमध्ये आपली हयात घालविलेले असंख्य इच्छुक स्वयंम घोषित नेते लग्नसराईच्या हंगामाचा उपयोग आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी विविध जाती, धर्माच्या लग्न समारंभात आवर्जून हजेरी लावत असल्याचे आढळून येत आहेत.

या महिन्याच्या पूर्वार्धात गारपिटीने अनेक लग्न सोहळ्यांमध्ये विघ्न आणले होते. मात्र आता वातावरण मोकळे असून प्रचंड ऊन तपत असतानाही शुभ्र पांढऱ्या कपड्यातील इच्छुक नेते मंडळी रणरणत्या उन्हालाही न जुमानता एकाच दिवशी जिल्ह्यातील अनेक लग्न समारंभात धावा-धाव करून उपस्थित राहत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला एक वर्षापेक्षा अधिक काळ उरलेला असतानाही राजकारणामध्ये केव्हा काय घडेल याची सुतराम शक्यता नसल्याने आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्या उज्वल राजकीय भविष्यासाठी वधू-वरांच्या डोक्यावर हात ठेवून ही पुढारी मंडळी त्यांना आशीर्वाद देत आहेत व वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या नागरिकांकडून मनोमनी विधिमंडळात पाठवण्यासाठी आशीर्वादाचीही अपेक्षा या निमित्ताने करताना दिसत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button