गडचिरोली: चालत्या दुचाकीवर वीज पडून पती-पत्नी, 2 मुली ठार | पुढारी

गडचिरोली: चालत्या दुचाकीवर वीज पडून पती-पत्नी, 2 मुली ठार

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : अंगावर वीज पडल्याने पती, पत्नीसह दोन चिमुकल्या मुली जागीच ठार झाल्या. ही घटना सोमवारी (दि.२४) संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील दूध डेअरीजवळ घडली.

भारत राजगडे(३५), अंकिता राजगडे(२८), चिऊ राजगडे(१), देवांशी राजगडे(४) अशी मृतांची नावे असून, हे कुटुंब देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील रहिवासी होते. भारत राजगडे हे आपल्या कुटुंबासह पुराडापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलधोकडा येथे लग्नाला मोटारसायकलने गेले होते.

कार्यक्रम आटोपून परत येताना देसाईगंजनजीकच्या दूध डेअरीजवळ पोहचताच रिमझिम पाऊस सुरु झाला. त्यामुळे ते एका झाडाखाली थांबले. यावेळी अचानक वीज कोसळल्याने चौघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button