भंडारा : घटसर्पाने चार दिवसांत २० जनावरांचा मृत्यू; पशुपालक चिंतेत | पुढारी

भंडारा : घटसर्पाने चार दिवसांत २० जनावरांचा मृत्यू; पशुपालक चिंतेत

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : घटसर्पाच्या प्रकोपामुळे चार दिवसात २० जनावरांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव येथे उघडकीस आला आहे. यानंतर पशुसंवर्धन विभागाने तात्काळ गावात धाव घेत लसीकरणाला प्रारंभ केला. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी मृत जनावरे वैनगंगा नदी काठावर फेकली. त्यामुळे मृत जनावरांच्या संपर्कात आल्याने अन्य जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. घटसर्पाच्या प्रकोपामुळे पशु पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव (मुंढरी) येथे जनावरांना होणाऱ्या घटसर्प आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. चार दिवसांत २० जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांसह पशुपालक चिंतेत आहेत. यात लहान व वयस्कर जनावरांचा समावेश आहे. डोळ्यादेखत अंगणातील पाळीव जनावरांच्या मृत्यूने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. पशू विभागाने वेळीच उपाययोजना केली असती तर आमची जनावरे दगावली नसती, अशा भावना शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

घटसर्पाच्या प्रादुर्भावानंतर पशुसंवर्धन विभागाने तात्काळ पावले उचलत मोहाडी येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांचे पथक कान्हळ गावात दाखल झाले. गावात घटसर्प व एकटांग्या रोगाचे लसीकरण सुरू आहे. रविवारी (दि. २२) रोजी ९० जनावरांचे तर सोमवारी (दि. २३) रोजी ६० जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मृत जनावरांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी जनावरांचे शवविच्छेदन करुन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button