मुदाळतिट्टा : पाण्यासाठी शेतकरी ढाळतोय अश्रू, रस्त्यासाठी प्रवासी वर्ग फोडतोय टाहो! | पुढारी

मुदाळतिट्टा : पाण्यासाठी शेतकरी ढाळतोय अश्रू, रस्त्यासाठी प्रवासी वर्ग फोडतोय टाहो!

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा :  राधानगरी- निपाणी मार्गावरील मुदाळतिट्टा (ता. कागल ) येथे काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील पुलाचे बांधकाम गेले कित्येक दिवस सुरू आहे. त्यामुळे पाणी बंद आहे. त्याचबरोबर गेले अनेक वर्षे राधानगरी- निपाणी रस्त्याचे काम सुरू असून अद्यापही ते अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे ‘पाण्यासाठी शेतकरी ढाळतोय अश्रू तर रस्त्यासाठी प्रवासी फोडतो टाहो’ अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. राधानगरी, भुदरगड, कागल या तीन तालुक्याशी संबंधित असणाऱ्या या प्रश्नांकडे नेत्यांनी दुर्लक्ष केले असून ते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यात रंगून गेले आहेत.

काळम्मावाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडा अशी मागणी शेतकरी वर्ग अनेक दिवसापासून करत आहे. पण मुदाळतिट्ट्याजवळ असणाऱ्या उजव्या कालव्यावरील पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे पाणी सोडण्यात अडथळा निर्माण झाला आहे. ठेकेदार कंपनीने कोणत्याही पद्धतीची पूर्वसूचना न देत किंवा पाणी सोडण्याचे नियोजन न करता काम हातात घेतल्यामुळे कागल, भुदरगड, राधानगरी तालुक्यातील ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात झळ बसली आहे. लागण केलेला ऊस व तुटून गेलेला खोडवा तर जागच्या जागीच पाण्याअभावी थांबला आहे. लावण केलेले ऊस क्षेत्र वाळून जाण्याची शक्यता निर्माण झाली. अन्य पिकालाही मोठ्या प्रमाणात झळ बसली आहे. उभे पीक हातचे जात असल्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक कणाच मोडला जाणार आहे. पुलाचे काम थांबवा आणि पाणी ताबडतोब सोडा अन्यथा पाण्यासाठी उजव्या काव्यावर ‘जल आक्रोश मोर्चा’ काढण्याचा इशारा शेतकरी बांधव देत आहेत.

देवगड -निपाणी रस्त्याचे काम गेले तीन वर्षे होऊन अधिक काळ सुरू आहे. काही ठिकाणी पूर्ण तर काही ठिकाणी अपूर्ण अशा अवस्थेत काम असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होवून वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा फटका प्रवासी जनतेला होताना दिसून येत आहे. आदमापूरच्या बाळूमामा देवालयाच्या अमावस्या यात्रेवेळी ही ठेकेदार कंपनी रस्त्याच्या काही ठिकाणची अपुरी कामे खोदकाम करते व अमावस्या झाल्यानंतर काम हाती घेते. अशा बऱ्याच अमावस्याला कामाची अवस्था झाल्याने वाहतुकीची कोंडीदेखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. याला ठेकेदार कंपनीच जबाबदार आहे असल्याचे जाणकार बोलत आहेत. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काही होमगार्ड नेमण्यात आलेले आहेत. पण त्यांनी सुद्धा हात टेकले आहेत. रस्ता पूर्ण झाल्याशिवाय वाहतुकीची कोंडी सुटणार नाही अशी स्थिती असताना सुद्धा नेते मंडळी दुर्लक्ष करताना दिसत आहेत असा आरोप जनतेतून होत आहे.

पाण्यासाठी शेतकरी ढाळतोय अश्रू तर रस्त्यासाठी प्रवासी वर्ग फोडतोय टाहो अशी अवस्था निर्माण झाली असताना नेते मंडळी आरोप- प्रत्यारोपाच्या फेरीत पूर्णपणे रंगून होऊन गेले आहेत. नवी उद्घाटने त्यांच्या हातून होत आहेत. या प्रश्नाकडे त्यांचा काना डोळा होताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर तर प्रचंड तीव्र भावना व्यक्त होताना दिसत आहेत. तरीही याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. भाजपच्या सरकारच्या कालावधीत सुरू झालेले काम, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात रेंगाळले आत्ता पुन्हा भाजपची सत्ता राज्यात आहे. ज्यांनी हा रस्ता मंजुर केला. त्यांनी तर आता लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशा भावना व्यक्त होताना दिसत आहेत.

पुलामुळे शेतीला पाणी मिळत नाही यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि लवकरात- लवकर पाणी सोडावे, यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांना भेटून व्यथा मांडणार आहे. लवकरच मुदाळतिट्टा या ठिकाणी मोठे जनआंदोलन उभा केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
-मनोज फराक्टे ( माजी जि.प.सदस्य बोरवडे )

हेही वाचलंत का? 

Back to top button