चंद्रपूर : शौचालयासाठी विद्यार्थी धडकले पंचायत समिती कार्यालयावर | पुढारी

चंद्रपूर : शौचालयासाठी विद्यार्थी धडकले पंचायत समिती कार्यालयावर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : सावली तालुक्यातील चकपेटगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधा (शौचालय, मुतारीघर व संरक्षणभिंत) उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आज (दि. 22) पंचायत समिती कार्यालयावर धडकले. भौतिक सुविधेच्या समस्या सोडवा, अशी मागणी सावलीचे गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी यावेळी केली.

सध्या सावली तालुक्यात वाघाने धुमाकूळ घातलेला असून नागरिक भयभीत झालेले आहेत. मागील आठवड्यात वाघाच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेलेला आहे. दिवसेंदिवस तालुक्यात वाघाची दहशत वाढतच आहे. सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चकपेटगाव येथे जिल्हा परिषद शाळा असून 1 ते 4 पर्यंत वर्ग आहेत. सदर गाव हे जंगलात असून वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. चकपेटगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भौतिक सुविधांचा अभाव आहे. या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी जंगलात शौचास जात आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू शकते. याकरिता पालकांनी मागील ऑक्टोंबर महिन्यामध्येच शाळेला भौतिक सुविधा पुरविण्यासाठी संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने अखेर विद्यार्थी पंचायत समिती कार्यालयावर जाऊन आपल्या मागणीचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले.

सर्व पालकांनी लोकप्रतिनिधी तसेच बीडीओ यांना भौतिक सुविधा पुरविण्याबाबत निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सध्या सावली तालुक्यात वाघाची दहशत असल्याने मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालक धास्तावले आहेत. त्यामुळे त्वरित भौतिक सुविधा उपलब्ध करून द्यावी.

– रेवनाथ भोयर, सभापती (शाळा व्यवस्थापन समिती)

या बाबीची गंभीर दखल घेत मी तत्काळ एमआरजीएस फंडातून शौचालय, मुत्रीघर, संरक्षण भिंत या भौतिक सुविधा पुरवण्यासाठी आदेश निर्गमित केलेले आहेत. येत्या आठवड्यात शौचालय व मुत्री घराचे बांधकाम सुरू करण्यात येईल.

– सुनिता मरसकोल्हे
गट विकास अधिकारी, पंचायत समिती, सावली

हेही वाचलंत का ? 

Back to top button