...तरीही मी राज्यातील जनतेसाठी लढत राहणार : जयंत पाटील | पुढारी

...तरीही मी राज्यातील जनतेसाठी लढत राहणार : जयंत पाटील

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: मला निलंबित केले, तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी मी लढतच राहणार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या  कृतीचा निषेध केला.

नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी धिवेशनात विरोधकांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून होत आहे.  महापुरुषांची बदनामी, राज्यातील तरुणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यांवर अजिबात चर्चा होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे. दिशाभूल करणारे विषय सभागृहात उपस्थित करून सभागृहाचा मौल्यवान वेळ सत्ताधारी पक्षातील आमदार वाया घालवत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला.

विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेले बेकायदेशीर भूखंड वाटप व गैरव्यवहाराबद्दल आम्ही उपस्थित करत असलेली चर्चा टाळण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत आहे. म्हणूनच मी सदनात उभे राहून ‘असा निर्लज्जपणा करू नका’, असे शिंदे – फडणवीस सरकारला उद्देशून म्हणालो. परंतु विरोधकांचा आवाज दाबण्याचा आणि विरोधकांवर वचक बसवण्याच्या उद्देशाने सरकारने मी असे विधान अध्यक्षांना उद्देशून केल्याचा बनाव केला. आणि मला हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले, असे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button