पुढारी ऑनलाईन डेस्क : फिरकीपटू कुलदीप यादवला (kuldeep yadav) बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आल्याने माजी क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) चांगलेच भडकले आहेत. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय अविश्वसनीय असल्याची टीप्पणी करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुलदीपने चट्टोग्राम कसोटीच्या पहिल्या डावात 40 धावांत पाच तर दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेऊन सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला होता. भारताच्या 188 धावांनी मिळवलेल्या विजयात कुलदीपचा मोठा वाटा असूनही त्याला दुस-या कसोटीत निराशेचा सामना करावा लागल्याची भावना गावस्करांनी व्यक्त केली आहे.
सामन्याची कॉमेंट्री करताना गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले, 'मागील सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला बाहेर काढणे, हे अविश्वसनीय आहे. मी फक्त हाच शब्द वापरू शकतो आणि तो सौम्य आहे. मी खूप कठोर शब्दात संघ व्यवस्थापनाच्या या निर्णायवर भाष्य केले असते, पण 20 पैकी 8 विकेट्स घेणाऱ्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूला बाहेर बसवणे हे अविश्वसनीय आहे.'
भारताचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) टॉसवेळी, आजची खेळपट्टी समजण्यापलीकडची असल्याने कुलदीपच्या जागी जयदेव उनाडकटला संधी देत असल्याचे म्हटले. पण राहुलच्या या मतावर गावस्कर (Sunil Gavaskar) भडकले. 'तुमच्याकडे आणखी दोन फिरकी गोलंदाज होते (रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल). इतर कोणत्याही फिरकीपटूला नक्कीच वगळता आले असते. पण ज्याने आठ विकेट्स घेतल्या, त्यालाच कट्ट्यावर बसावे लागले आहे. कुलदीपला मिळालेली ही वागणूक धक्का आहे.'