नागपूर : धर्मांतरित अनुसूचित जातींचे आरक्षण थांबवा : मिलिंद परांडे | पुढारी

नागपूर : धर्मांतरित अनुसूचित जातींचे आरक्षण थांबवा : मिलिंद परांडे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : धर्मांतरित अनुसूचित जातींना मिळणारे आरक्षण थांबवण्यात यावे, अशी मागणी विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेत केली. केवळ हिंदू अनुसूचित जातींनाच आरक्षणाचा अधिकार असताना अनुसूचित जातीतील धर्मांतरितांना आरक्षण देण्याची मागणी करण्याचे कारस्थान सुरू झाले आहे, असा आरोप परांडे यांनी केला. यावेळी विदर्भ प्रांतमत्री गोविंद शेंडे, अध्यक्ष राजेश निवल उपस्थित होते.

दुर्दैवाने हिंदू समाजात अनुसूचित जाती आणि जमातींना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक आधारावर भेदभावाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हिंदू समाजाचा हा भाग सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात १९३५ मध्ये पुण्यात झालेल्या संभाषणानुसार या वर्गांना आरक्षण देण्यावर व्यापक एकमत झाले आणि धर्माच्या आधारावर स्वतंत्र निवडणुकांना राष्ट्रविरोधी घोषित केले याकडे परांडे यांनी लक्ष वेधले.

१९३६ मध्येच ख्रिश्चन मिशनरी आणि मुस्लिम नेत्यांनी अनुसूचित जातीतील लोकांचे ख्रिश्चन आणि मुस्लिम पंथांमध्ये धर्मांतर केले. आणि त्याच्या आरक्षणाची मागणीही करण्यात आली. परंतु आंबेडकर आणि महात्मा गांधी यांनी तर्कशुद्धपणे मागणी फेटाळून लावली.
संविधान सभेतही जेव्हा अनुसूचित जातीच्या आरक्षणाची मागणी करण्यात आली. तेव्हा डॉ. भीमराव आंबेडकर यांनी धर्मांतरित अनुसूचित जातींची आरक्षणाची मागणी फेटाळून लावीत अनुचित ठरवले होते. १९५० मध्ये घटनात्मक आदेश जारी करून केवळ हिंदू अनुसूचित जातींनाच आरक्षण द्यावे, असे स्पष्ट केले होते, असे परांडे म्हणाले.

ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्याची गणना अनुसूचित जातीत होऊ शकत नाही, असे आंबेडकरांनी यापूर्वीही सांगितले आहे. असे असतानाही ख्रिश्चन मिशनरी त्यांच्या अवास्तव मागणीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंसह अनेक पंतप्रधानांनी ही मागणी अवास्तव असल्याचे सिद्ध करून नेहमीच फेटाळून लावली होती. राजीव गांधी, देवेगौडा आणि मनमोहन सिंग यांनी ही मागणी मान्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु उग्र देशव्यापी निषेधामुळे माघार घ्यावी लागली. २००५ मध्ये सच्चर समिती आणि २००९ मध्ये रंगनाथ समितीने या संदर्भात काही शिफारशी केल्या होत्या, परंतु त्यांच्यातील विरोधाभास आणि चुकीच्या पद्धतींमुळे त्या दोन्ही वादग्रस्त ठरल्या.

६ नोव्हेंबरपासून विहिंप अभियान सुरू करणार आहे. यात दीड लाख गावात भेट देऊन देशभरात १ कोटी युवकांना जोडणार आहे. धर्मरक्षेसोबत सामाजिक कामही आम्ही करणार आहे. अनुसूचित जातीचा ८० टक्के लाभ १८ टक्के लोक घेत आहेत.

दरम्यान, काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी केवळ स्वस्त लोकप्रियतेसाठी असे विधान केले आहे. पाटील यांनी कोणती गीता वाचली हे मला माहित नाही. गीता खूप पुरातन आहे. त्याचा जिहादचा काहीही संबंध नाही. गीतेत कर्मयोग सांगितला आहे, असेही परांडे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button