अजित दादांची तुफान फटकेबाजी: घरातील वरिष्ठ थेट कमरेला डबा बांधून विहिरीत फेकायचे, तेव्हापासून ते असं वागतात बघा…

अजित दादांची तुफान फटकेबाजी: घरातील वरिष्ठ थेट कमरेला डबा बांधून विहिरीत फेकायचे, तेव्हापासून ते असं वागतात बघा…

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामतीत अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे उभारण्यात आलेल्या आॅलम्पिक दर्जाच्या जलतरण तलाव उद्घाटन प्रसंगी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार कौटुंबिक फटकेबाजी केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या भाषणाच्या संदर्भासह ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या 'लुक'वरही अजित पवार यांनी फटाके फोडले. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही या फटकेबाजीचा आनंद घेतला. पोहण्याचा विषय भाषणात गाजला. आमच्या लहानपणी घरातील वरिष्ठ थेट आमच्या कमरेला डबा बांधून विहिरीत फेकून देत होते. तेव्हापासून वरिष्ठ आमच्याशी असं वागतात बघा, तरीही आम्ही इथवर पोहोचलोय, खरचं तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे, असे अजित पवार म्हणाल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार यांच्या फटकेबाजीने कार्यक्रमात मोठी रंगत आणली.

जलतरण तलावाच्या उद्घाटनानंतर मुख्य कार्यक्रम पद्मश्री अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडला. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, विश्वस्त सुनंदा पवार यांच्यासह जलतरणमध्ये आॅलम्पिक व पॅरालम्पिकमध्ये कामगिरी करणारे वीरधवल खाडे, सुयश जाधव, अभिषेक जाधव, चेतन राऊत, बाळासाहेब भिसे हे खेळाडू उपस्थित होते.

खासदार सुळे यांनी त्यांच्या भाषणात पोहायला कसे शिकलो, याचा किस्सा सांगितला. आमच्या लहानपणी असे जलतरण तलाव नव्हते. ओढा आणि विहिरीच्या पाण्यात आम्ही पोहायला शिकलो. अजितदादा यांचे वडील तात्यासाहेब आम्हा बहीण भावंडांना पोहायला घेऊन जात असे. कमरेला डबा बांधून थेट पाण्यात ढकलले जायचे. तेव्हापासून पाण्यात पडल्यावर पोहता येतं, ही म्हण लागू पडल्याचे त्या म्हणाल्या. शिवाय आम्हा बहिण-भावंडात पोहता येत नाही, असा एकही व्यक्ती नसल्याचे त्या म्हणाल्या. पुढे मुंबईत गेल्यावर जलतरण तलावात पोहणे सुरु केले. तेथे पोहण्याचे क्रेडीट मी आईला देईन, कारण वडीलांना माझ्यासाठी वेळ नव्हता. परंतु गावी शिकलेले पोहणे आयुष्यात महत्त्वाचे ठरल्याचे त्या म्हणाल्या. सुळे यांचे भाषण सुरु असताना अजित व राजेंद्र पवार या बंधूंनीही लहानपणी पोहायला शिकताना घडलेले किस्से एकमेकांना शेअर केले.

अजित पवार यांनी राजेंद्र पवार यांच्याशी केलेल्या चर्चेचा धागा भाषणात पकडला. ते म्हणाले, आमचे मोठे बंधू राजेंद्र हे मला आता लहानपणी पोहायला कसे शिकलो, लहानपणीचे दिवस कसे होते, हे सांगत होते. मी त्यांना म्हटलं, बघ जरा, लहानपणी काय होते, अन आता काय झालेय. सुप्रिया म्हणाली की, ओढ्यात पोहोयला शिकलो, वास्तविक तो ओढा नसून कालव्याचा फाटा होता. ३३ फाटा म्हणून तो ओळखला जातो. बहुतांश लोक फाटा किंवा विहिरीवरच पोहोयला शिकले. आमच्या घरातील वरिष्ठ मंडळी आम्हाला लागेल किंवा काय याची कोणतीही काळजी न करता थेट कमरेला डबा बांधत होते. त्याची दोरी सुटली तर थेट ढगात जावे लागेल, अशी भिती आम्हाला वाटायची. मी तर पाण्याला फार घाबरायचो. पण घरातील वरिष्ठ ऐकत नव्हते. ते थेट धरून विहिरीत फेकून द्यायचे. तेव्हापासून वरिष्ठांचे आमच्याशी असं वागणं सुरु आहे बघा, असे अजित पवार म्हणताच मोठा हशा पिकला. माझा लहान भाऊ श्रीनिवास पोहायला शिकला. त्याने मला घरी येऊन रात्री ते सांगितले. आपला लहान भाऊ पोहायला शिकतो आणि आपल्याला पोहता येत नाही, या विचाराने मला रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी थेट विहिरीवर जात मी धाडसाने पोहायला सुरुवात केल्याची आठवण त्यांनी सांगितली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव आता उपलब्ध झाला. आमच्यावेळी बारामतीत तीन हत्ती चौकातील जुन्या पुलावरून जो कालव्यात उडी मारेल, तो चांगला पोहणारा, असे समिकरण होते, अशी आठवण सांगितली.

उंटावरून शेळ्या हाकणे नको

जलतरण तलाव उद्घाटनप्रसंगी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित होते. याबाबत खासदार सुप्रिया सुळे भाषणात म्हणाल्या, बारामतीप्रमाणे इंदापूरला आम्ही स्पोर्ट काॅम्प्लेक्स उभे करत आहोत. या कामासाठी अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी ३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. राजेंद्र पवार यांनी त्यासंबंधी आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली. त्यावर अजित पवार यांनी, बारामतीप्रमाणे सगळीकडे सोयी सुविधा झाल्या पाहिजेत, परंतु इंदापूरला बारकाईने हे काम बघणार कोण, असा सवाल उपस्थित केला. राजेंद्र पवार आठवड्यातून एखादा दिवस देऊ शकतील. पण उंटावरून शेळ्या हाकणे शक्य होणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. आव्हान स्विकारा, टीम तयार करू, बारामतीप्रमाणे तेथेही सुविधा देऊ, असेही ते म्हणाले.

तुम्ही तर आता भाऊ- भाऊ दिसता…

अजित पवार यांच्या फटकेबाजीतून राजेंद्र पवार हे ही सुटले नाहीत. राजेंद्र पवार यांनी परिधान केलेल्या जीन्स, टी शर्ट, बुटवरून अजित पवार यांनी फटकेबाजी केली. आमचे मोठे बंधू तर आज वेगळेच दिसत आहेत. मीच त्यांच्यापेक्षा आता मोठा दिसायला लागलो आहे, ते तरुण दिसतात. राजूदादा आणि रोहित हे आता वडील-मुलगा नव्हे तर भाऊ- भाऊ दिसू लागले आहेत. त्यावर सभागृहात मोठा हशा पिकला. राजेंद्र पवार यांच्याकडे निर्देश करत, आम्हालाही जरा सांग, काय करायचं. ते तु सांगशील ते आम्ही सगळं करतो. आजवर तुझं ऐकत आलोच आहोत. यापुढेही ऐकू अशा शब्दात अजित पवार यांनी राजेंद्र पवार यांच्यावर फटकेबाजी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news