आगामी निवडणुकीत शिंदे गटाची भाजपसोबत युती : खासदार कृपाल तुमाने | पुढारी

आगामी निवडणुकीत शिंदे गटाची भाजपसोबत युती : खासदार कृपाल तुमाने

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भातील संघटना बळकट करण्यासाठी पदाधिकारी नेमले. ते अधिक बळकट करण्यासाठी नवरात्रात विदर्भातील नागपूर आणि अमरावती येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मेळावे आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार कृपाल तुमाने यांनी आज (दि.६) पत्रकार परिषदेत दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत युती करून लढवणार असल्याचे तुमाने यांनी यावेळी सांगितले. नवरात्रात शिवसेनेबाबत मोठा धमाका करणार असल्याचा दावाही शिंदे गटाचे किरण पांडव यांनी केला.

भाजपसोबत आमचे सर्व ठरलेले आहे. याबाबत राज्यस्तरीय पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात येईल, असे तुमाने म्हणाले. आमचीच शिवसेना ओरिजनल आहे. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. महिनाभरात निवडणूक आयोगाचा निकाल येईपर्यंत वाट पाहा, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करून अनंत चतुर्दशीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होईल, अशी माहिती तुमाने यांनी दिली. नागपूर महापालिकेत भाजपसोबत १२० जागा लढविणार असल्याचे ते म्हणाले.

शिंदे गटाच्या या निर्णयामुळे नागपूर महापालिका निवडणुकीत घमासान होणार आहे. महापालिकेत उद्धव ठाकरे गटाची तशीही ताकद नाही. येथे त्याचे दोन नगरसेवक आहेत. भाजपासोबत अजून मनसेची युती झालेली नाही. ती झाल्यास समीकरण आणखी बदलू शकतात.
सध्या महापालिकेत भाजपची सत्ता आहे. काँग्रेस दोन नंबरवर आहे. तर राष्ट्रवादी नगण्य आहे. शिंदे गट सोबत आल्यामुळे भाजपचा मार्ग सुकर होईल, असे चित्र आहे. मनसेची युती झाल्यास मनसेला फायदाच होईल. कारण त्यांचा एकही नगरसेवक नाही.

हेही वाचलंत का ?

Back to top button