नागपूर : एटीएम फोडून ६ लाखांची रोकड लंपास | पुढारी

नागपूर : एटीएम फोडून ६ लाखांची रोकड लंपास

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: रामदास पेठेतील अत्यंत वर्दळीच्या बिग बाजार मॉलला लागून असलेले स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी ५ लाख ८२ हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना आज ( दि. 30 )  सकाळी उघडकीस आली. बिग बाजार सारख्या वर्दळीच्या ठिकाणचे एटीएमही सुरक्षित नसल्याने खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम आणि बर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.  पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक आरोपी दिसून आला आहे.

विशेष म्हणजे आरोपीने कोणतीही तोडफोड न करता एका चावीच्या साहाय्याने कोड टाकून एटीएममधील कॅश काढली. बँकेने १४ जुलैला एटीएममध्ये कॅश भरली होती. यात एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा हात आहे का ? या दिशेनेही पोलीस तपास करीत असल्याची माहिती बर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस यांनी दिली.

नागपुरात एटीएम फोडण्याच्या घटना नवीन नाहीत. यापूर्वी जून २०१८ मध्ये नागपूरमध्ये एका रात्रीत ३ एटीएम फोडल्या होत्या. ही तिन्हीही एटीएम एसबीआयची होती. जरीपटका भागातील सर्व एटीएम होते. हे एटीएम मध्यरात्री फोडण्यात आले होते. तसेच १३ जुलै २०२१ रोजी नरेंद्र नगरातील स्टेट बँकेचे एटीएम दगडाने फोडून चोरट्यांनी रोख रक्कम काढण्याचा प्रयत्न केला होता. दगड आणि पेचकसचा वापर करून चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिथून एक कार पास झाली. पोलिसांचे वाहन असल्याचे समजून चोरट्यांनी पळ काढला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button