Jitendra Awhad : आता राजभवनात घुसून राज्यपालांना हाकलून देण्याची वेळ : जितेंद्र आव्हाड | पुढारी

Jitendra Awhad : आता राजभवनात घुसून राज्यपालांना हाकलून देण्याची वेळ : जितेंद्र आव्हाड

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन राजभवनात घुसून राज्यपालांना हाकलून देण्याची आता वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. सोमवारी त्यांच्याविरोधात जोडोमार आंदोलन करण्यात येणार असून तेच जोडे त्यांना पाठविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचा आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज (दि.३०) पत्रकार परिषदेत खरपूस समाचार घेतला.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, यापूर्वीही राज्यपाल कोश्यारी यांनी राज्याचा वारंवार अपमान केला आहे. जेव्हा राज्यपालांनी महात्मा जोतिबा फुले यांचा अपमान केला. तेव्हाच त्यांना त्यांची जागा दाखवायला हवी होती. राज्यपालांना महामहीम म्हणून बोलले जाते. मात्र, आता त्यांची ती देखील लायकी राहिलेली नाही. त्यांनी मराठी माणसाचा नाही, तर त्यांच्या अस्मितेचा अपमान केला आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा अपमान कधीही सहन करणार नाही.

मुंबई ही सहजासहजी मिळाली नसून त्याकरिता रक्ताचे पाट वाहले आहेत. मुंबई हे देशाचे व्यावसायिक रूप असलेले शहर आहे. यश हा मुंबईच्या मातीचा गुण असून राज्यपालांनी जे वक्तव्य केले आहे. त्याने सह्याद्रीचा मराठी मातीचा अपमान झाला आहे. परिणामी आता सर्वच मराठी माणसांनी एकत्र येऊन राजभवनात घुसून या राज्यपालांनाच हाकलून देण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात सोमवारी आंदोलन करणार आहे. त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून तेच जोडे त्यांना भेट म्हणून पाठविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button