विदर्भातही शिंदे गट वरचढ शिवसेना आता नावालाच | पुढारी

विदर्भातही शिंदे गट वरचढ शिवसेना आता नावालाच

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात विदर्भातील बहुतांश निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रवेश केला आहे. विदर्भातही शिवसेनेचे नेते म्हणून शिवसैनिकांनी शिंदेंना पसंती दिली आहे. या सर्व घडामोडींचा भविष्यात होणार्‍या नगर परिषदा, महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर कसा परिणाम होईल हे मात्र येणारा काळच ठरवेल.

नागपुरातील महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेच्या बदलत्या राजकारणाचा विशेष फरक पडला नाही. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुकाप्रमुख, दर्यापूर शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल पाटील-अरबट यांच्यासह पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले आहेत.
ठाणे येथील उपमहापौर रमाकांत माडवी यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या दर्यापूर तालुका येथील गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला. हा मतदारसंघ अमरावतीचे शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांचा आहे. ठाणे येथील उपमहापौर रमांकात माडवी यांची अमरावती येथे गुप्त बैठक झाली. त्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शिवसेना पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान शुक्रवारी दर्यापूर येथेही शिवसेनेचे तालुकाप्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकार्‍यांनी दर्यापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत त्यांच्या गटात जाहीर प्रवेश केलेला आहे. यात प्रामुख्याने गोपाल अरबट यांच्यासमवेत रवी गणोरकर, विनय गावंडे महेंद्र भांडे, राहुल भुंबर ,राहुल गावंडे, दुराटे, कोरडे, काठोळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केतला. या प्रवेशामुळे आता शिंदे गटाचे वर्चस्व दिसून येत आहे.

भंडारा

भंडार्‍यातील शिवसेना आमदारांच्या बाजूने उभी राहिली आहे. भंडारा विधानसभेचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (शिवसेनेचे निष्ठावान) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांच्या पाठोपाठ जिल्ह्यातील अनेक शिवसेना पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरपरिषद सदस्यांनीसुद्धा शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

नरेंद्र भोंडेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत. ते शिंदे गटासोबत गेल्यानंतर जिल्हा परिषदेतील एक महिला सदस्य, पवनी पंचायत समितीचे तीन सदस्य, भंडारा पंचायत समितीचा एक सदस्य, पवनी नगरपरिषदेतील एका महिला सदस्याने त्यांना पाठिंबा दिला आहे. याशिवाय शिवसेनेने अनेक पदाधिकारी भोंडेकर यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात आ. भोंडेकर यांचे वजन वाढले आहे. आ. भोंडेकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेतील दुसरा गट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचे दिसून येते.

यवतमाळ

आमदार संजय राठोड यांच्यापाठोपाठ खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश केला. या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेचे दोन गट पडले आहे. खासदार भावना गवळी यांना प्रतोदपदावरून हटविल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. मात्र, त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी भावना गवळी यांना पक्षात स्थान नसल्याचे वक्तव्य केल्याने गवळींचे कार्यकर्ते प्रचंड संतापले. दरम्यान, 17 जुलैला खासदार गवळी यांचे समर्थक तसेच त्यांच्या गटातील सर्व पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. स्थानिक विश्रामगृह येथे शिंदे गटाकडून आलेले राजेंद्र फाटक तसेच संदीप नटे यांच्या उपस्थितीत समर्थन पत्र देऊन जवळपास 35 ते 40 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख पिंटू बांगर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसन्न रंगारी, बाभूळगाव तालुकाप्रमुख वसंत जाधव, रमेश अगरवाल, गोपाळ पाटील, हरी लिंगनवार बाभूळगाव येथील नगराध्यक्ष तसेच आठ सदस्य उपस्थित होते.

बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटाला जाऊन मिळाले. यापूर्वीच शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन आमदार संजय गायकवाड (बुलडाणा) व संजय रायमूलकर (मेहकर) हे बंडाच्या सुरुवातीपासूनच शिंदे गटात गेलेले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेचे 9 जि.प. सदस्य, तर पं.स.चे 26 सदस्य आहेत.तसेच जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांत मिळून शिवसेनेचे 53 नगरसेवक होते. त्यांचा कार्यकाल संपलेला आहे. जिल्ह्यात मुख्यत्वे खासदार व दोन आमदारच या घडीला शिंदे गटात गेलेले आहेत. ग्रामस्तरावरील अन्य पदाधिकारी सध्या शिवसेनेत किती ?आणि शिंदे गटात किती? याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. येत्या काही दिवसांत ते समजेल. न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष ठेवून जि.प. व पं.स. सदस्य, माजी नगरसेवक हे कोणता झेंडा घेऊ हाती, याबाबतची भूमिका ठरवतील असे दिसत आहे.

अकोला

माजी आमदार बाजोरिया सध्या तरी कुंपणावरच आमदार देशमुखांसह जिल्हाप्रमुख व शहरप्रमुख ठाकरेंच्या बाजूनेच अकोल्यात सध्या शिंदे गटात कुणी सामील झालेले नाही. मात्र, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया समर्थकांसह शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहे. याअनुषंगाने बाजोरिया यांनी अकोल्यात शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसैनिक व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीला प्रामुख्याने शहरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, या बैठकीला विद्यमान जिल्हाप्रमुख गोपाल दातकर व आमदार नितीन देशमुख व शिवसेना शहरप्रमुख अतुल पवनीकर अनुपस्थित आढळून आले. जिल्हा परिषदेत सेनेचे 8, तर महानगरपालिकेत 7 सदस्य आहेत. हे सर्व सदस्य देशमुख व दातकर यांच्या गटातील आहेत. त्यामुळे देशमुख व दातकर हे शिंदे गटात गेले नाही तर जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत फारसा फरक पडणार नाही.

Back to top button