चंद्रपूर : रेती व्यावसायिकाकडून २५ हजारांची लाच घेताना तलाठ्याला अटक | पुढारी

चंद्रपूर : रेती व्यावसायिकाकडून २५ हजारांची लाच घेताना तलाठ्याला अटक

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : रेती पुरविणाऱ्या एका व्यवसायिकाकडून 25 हजारांची लाच घेताना राजूरा तालुक्यातील वरूर येथील तलाठ्यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. मंगळवारी ही कारवाई राजूरा तालुक्यातील वरूर येथे करण्यात आली आहे. विनोद गेडाम (वय 45)असे लाच घेणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे. या कारवाईने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा रेती पुरवठा करण्याचा व्यावसाय आहे. 8 फेब्रुवारी 2021 रोजी सदर व्यावसायिकाचा रेतीचा ट्रक तलाठी विनोद गेडाम यांनी पकडून 70 हजार रूपयांची मागणी केली होती. त्यापैकी 35 हजार रूपये घेऊन ट्रक सोडून देण्यात आलेला होता. उर्वरित रक्कम त्यानंतर देण्याचे ठरले होते. नंतर परत सदर तलाठ्याने रेती पुरवठा व्यावसायिकाकडे 25 हजाराची मागणी केली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र तक्रारदाराला तलाठ्यास लाचेच्या रूपात पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीची सखोल चौकशी केल्यानंतर तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. दरम्‍यान मंगळवारी तलाठी गेडाम याला विरूर येथे 25 हजार रूपये घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक अविनाश भामरे, नरेश नन्नावरे, रोशन चांदेकर, रविढें, संदेश वाघमारे, मेघा मोहूर्ले, सतिश सिडाम यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button