लोणार वन्यजीव अभयारण्य विस्तारास मान्यता | पुढारी

लोणार वन्यजीव अभयारण्य विस्तारास मान्यता

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : लोणार सरोवराजवळ असलेल्या वन्यजीव अभयारण्याचा विस्तार करण्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन्यजीव मंडळाच्या अठराव्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. अभयारण्याच्या बफर झोन वाढीसाठी आवश्यक असलेली 86 हेक्टर खासगी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया त्वरीत पूर्ण करण्याचे तसेच पुनर्वसन कराव्या लागणाऱ्या नागरिकांशी चर्चा करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना दिले आहेत.

खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवराचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी 2002 साली या परिसरास लोणार वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. 383 हेक्टर क्षेत्रामध्ये विस्तारलेले हे अभयारण्य लोणार शहराला लागून असल्याने येथील वन्यजीव व वनसंपदेची हानी होत आहे. अभयारण्य परिसरातील 3.65 हेक्टर क्षेत्र वन्यप्राण्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने असुरक्षित नोंदवले गेले आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाने अभयारण्याच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन्यजीव मंडळाच्या अठराव्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. यानुसार अभयारण्याचे बफर झोनसाठी 86 हेक्टर खासगी जमीन संपादीत केली जाणार आहे. त्यामुळे अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ 469 हेक्टर एवढे होईल. तसेच वन्यजीव व वनसंपदेच्या संवर्धनासाठी अभयारण्याचे विस्तारीकरण महत्वाचे ठरणार असुन या पट्ट्यात असलेल्या इजेक्टा ब्लॅन्केटच्या संवर्धनासाठीही उपयुक्त ठरणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button