कोल्हापूर: विशाळगडावर कुर्बानीस मनाई: बंद ठेवून प्रशासनाचा निषेध

कोल्हापूर : विशाळगडावर कुर्बानीस मनाई केल्याने   बंद ठेवून ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध केला.
कोल्हापूर : विशाळगडावर कुर्बानीस मनाई केल्याने बंद ठेवून ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध केला.

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा: विशाळगड येथील उरूस काळात कुर्बानी करण्यास मुंबई खंडपीठाने परवानगी दिली असतानाही पोलीस व महसूल प्रशासनाने गडावर येणाऱ्या भाविकांना कुर्बानी करण्यास आज (दि. १७) मनाई केल्याने येथील दर्गा ट्रस्टी व ग्रामस्थांनी आज ईद सण साजरा न करता एक दिवस विशाळगडावरील सर्व व्यवहार, बाजारपेठ बंद ठेवून प्रशासनाचा निषेध केला.

पुरातत्व व वस्तू संग्रहालय उपसंचालकांनी किल्ले विशाळगडच्या संरक्षित क्षेत्रातील पशुबळी प्रथेवर दीड वर्षापूर्वी बंदी घातली होती. त्या विरोधात मलिक रेहान दर्गा ट्रस्टीनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार बी. पी. कुलाबावाला व न्यायमूर्ती एफ. पी. पुनावाला यांच्या खंडपीठाने दि. १७ ते २१ जून या पाच दिवसांसाठी कुर्बानी करण्यास शुक्रवारी परवानगी दिली होती.

गडावर रविवारीपासून ईद व उरूसाची जय्यत तयारी केली गेली. पण आज सकाळी गडाच्या पायथ्याशी प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून तहसिलदार रामलिंग चव्हाण व डी.वाय.एस.पी. आप्पासाहेब पाटील व शाहूवाडी पोलिस ठाण्याने गडावर कुर्बानी करण्यास जाणाऱ्या भाविकांना पायथ्याशीच अडवले व कुर्बानीस मनाई केली. यामुळे गडवासियांच्यात तीव्र नाराजी पसरली.

यावेळी तहसीलदार रामलिंग चव्हाण, डीवायएसपी आप्पासाहेब पाटील, पीआय विजय घेरडे, दर्गा ट्रस्टी नाझीम मुजावर, मुराद मुजावर, अबुबक्कर मुजावर, शराफत मुजावर, आयुब कागदी, बंडू भोसले, चंद्रकांत जंगम, योगेश भोसले, मनोज भोसले पुरातत्व विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ईद सण व उरूसानिमित्त पशुबळी देण्यास परवानगी दिली आहे, पण न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून आमच्यावर अन्याय केला जात आहे, असे आयुब कागदी व दर्गा ट्रस्टी नाजीम मुजावर यांनी सांगितले.

गडावर राहणे येथील गडवासीयांचा गुन्हा आहे का?

आया-बहिणींच्या पर्सची तपासणी केली जाते. मांसाहारास बंधने घातली जातात. मुलांच्या शाळेची बस देखील गडाच्या पायथ्याशी येऊ दिली जात नाही. अशी बंधने कोणत्याही गडावर नाहीत. मग विशाळगडावरच या जाचक अटी का? गडावर राहणे गुन्हा आहे का? असा प्रश्न ग्रामस्थ बंडू भोसले यांनी उपस्थित केला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news