कात्रज चाैकातील उड्डाणपुलाचा प्रवास कासवगतीने

कात्रज चाैकातील उड्डाणपुलाचा प्रवास कासवगतीने

पुणे : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वी भूमिपूजन झालेल्या सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असताना कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम मात्र अद्याप सुरू झालेले नाही. या उड्डाणपुलाच्या कामाचा प्रवास कासवगतीने सुरू आहे.

सातारा रस्त्यावरील कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय) माध्यमातून वंडरसिटी ते कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावरील राजस सोसायटी चौकापर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या आवारातही उड्डाणपुलाचा पिलर उभारण्यात येणार आहे. या उड्डाणपुलामुळे देहूरोड बाह्यवळण रस्त्याने सोलापूरकडे जाणार्‍या जड वाहनांसोबत अन्य वाहनांनाही कात्रज-कोंढवा रस्त्याकडे जाणे सोईस्कर होणार आहे.

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये उड्डाणपुलाचा पिलर उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेदेखील परवानगी दिली आहे. या उड्डाणपुलाच्या कामाचे आणि सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भूमिपजून 24 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यानंतर सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

आतापर्यंत केवळ राजस सोसायटी चौकामध्ये आणि प्राणिसंग्रहालयालगत 'कोअर' घेण्यात आला. कात्रज चौकातून पुलाखालून राजस सोसायटीकडे जाणारा रस्ता बॅरिकेड लावून बंद करण्यात आला आहे. तसेच, कात्रज-नवले बि—ज रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. यासंदर्भात एनएचआयचे वरिष्ठ अधिकारी धनंजय देशपांडे म्हणाले, 'या कामांसंदर्भात तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. लवकरच पुलाचे काम सुरू करण्यात येईल.'

भूसंपादनाअभावी रस्तारुंदीकरण ठप्प

भविष्यातील गरज ओळखून कात्रज-कोंढवा रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल उभारण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत, अशी सूचना गडकरी यांनी केली होती. मात्र, या रस्त्याचे
रुंदीकरण भूसंपादनाअभावी थांबले आहे. महापालिकेने रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली असून, ज्या ठिकाणी खड्डे होते तेथे डांबरीकरण केले आहे. त्यामुळे तूर्तास तरी कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाचे काम होणार नाही, अशी चिन्हे दिसतात.

logo
Pudhari News
pudhari.news