दक्ष, जान्‍हवीसह नागपुरातील सात जणांनी सर केला ‘एव्‍हरेस्‍ट बेस कॅम्‍प’ | पुढारी

दक्ष, जान्‍हवीसह नागपुरातील सात जणांनी सर केला ‘एव्‍हरेस्‍ट बेस कॅम्‍प’

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनानंतर पुन्हा एकदा ट्रेकिंग, एव्‍हरेस्‍ट मोहीमांना प्रारंभ झाला असून नागपूरमधून गेलेल्‍या सात युवकांनी ‘एव्‍हरेस्‍ट बेस कॅम्‍प’ पर्यंतची मजल यशस्‍वीरित्‍या पूर्ण केली. यामध्ये १५ वर्षीय दक्ष खंते व १९ वर्षीय जान्‍हवी दोरसटवार या युवा गिर्यारोहकांसह अभिनय सिंग, राहूल यादव, सचिन पालेवार, विवेक ठाकूर यांनीही सहभाग नोंदवला.

सीएसी ऑलराऊंडर या साहसी संस्‍थेद्वारे आयोजित करण्‍यात आलेल्‍या एव्‍हरेस्‍ट बेस कॅम्‍प मोहीमेचे नेतृत्‍व नागपूरातील पहिला एव्‍हरेस्‍ट सर करणारा युवा गिर्यारोहक प्रणव बांडेबुचे यांनी केले. २४ एप्रिल रोजी काठमांडू ते लुकला असा छोट्या विमानातून प्रवास करत ही चमू २८०० मीटर उंचीवरील लुकला येथे पोहोचली. १३० किलोमीटरच्‍या या ट्रेकिंग प्रवासात फकडिंग, नामचे, तेंगबुचे, दींगबुचे, लोबुचे, गोरक्षेप‍ आणि एव्‍हरेस्‍ट बेस कॅम्‍प् असा एकूण ५३४८ मीटरचा टप्‍पा १ मे पर्यंत पार केला.

हा प्रवास करीत असताना दिंगबुचे येथे प्रवासाच्‍या पाचव्‍या दिवशी ५०२४ मीटर उंचीवरील माऊंट नागार्जुनवर त्‍यांनी यशस्‍वी चढाई केली. यावेळी या युवा गिर्यारोहकांच्‍या चमूने प्रचंड वेगाने येणाऱ्या वाऱ्याचा व बर्फवृष्‍टीचा, सतत बदलणाऱ्या हवामानाचा सामना करण्‍यासोबत अनेक अडचणींवर मात केली.

ट्रेकिंग दरम्‍यान, माऊंट अमा दब्‍लाम, माऊंट आयलँड, माऊंट थामसेकरू, माऊंट लोबुचे व एव्‍हरेस्‍ट सर करताना धाराशाही पडलेल्‍या लुकला येथील गिर्यारोहकांच्‍या स्‍मारकाला श्रद्धांजली वाहिल्‍यानंतर १ मे रोजी या चमूने माऊंट एव्‍हरेस्‍टच्‍या ५३६० मीटर उंचीवरील बेस कॅम्‍पकडे जाण्‍यासाठी ट्रेकिंग सुरू केले.

कठीण अशा विपरित परिस्थितीत जिद्द, हिम्‍मत, सातत्‍य राखत, एकमेकांना प्रोत्साहन देत ही चमू एव्‍हरेस्‍ट बेस्‍ट कॅम्‍पपर्यंत पोहोचल्‍यानंतर गिर्यारोहकांच्‍या चमूने एकमेकांचे अभिनंदन करीत आनंदोत्‍सव साजरा केला. परतताना वातावरण अतिशय खराब होते. त्‍यामुळे त्‍यांना लुकला ते काठमांडू हेलिकॉप्‍टरने यावे लागले.

हेही वाचलंत का ?

 

Back to top button