नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर परिसरात सातत्याने भूकंपाच्या धक्क्यांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही आदी ठिकाणी सौम्य भूकंपांची नोंद होत आहे. परंतु, हे धक्के भुकंपाचेच की इतर कारणांमुळे यासंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम होता.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (भाभूस)नेही भूकंपांबाबत वेळोवेळी अभ्यास करून अहवाल जारी केले आहेत. भाभूस मध्य क्षेत्र या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. स्थानिक प्रशासनाच्या विनंतीवरून भाभूस आगामी क्षेत्रीय कार्यक्रमांमध्ये नागपूर क्षेत्रीय तपास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात भूगर्भशास्त्रज्ञ सविस्तर अभ्यास करून या भूकंपाची कारणे शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भाभूसच्या वतीने आज स्पष्ट करण्यात आले.
भाभूसच्या मते, नागपुरात ३ ते ९ मेदरम्यान २.४ ते २.७ तीव्रतेचे भूकंप सिस्मोग्राफवर नोंदवले गेले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस)द्वारे प्रसिद्ध केलेल्या सिस्मोग्राफमध्ये मागील भूकंपाच्या घटनांची नोंद करण्यात आली होती. जी सर्वसामान्य जनतेला जाणवली नाही. एनसीएस (नवी दिल्ली), पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक विभाग असून, भारत सरकारद्वारे नामांकित आहे. या भूकंपाच्या घटनांचा अहवाल देण्यासाठी नोडल/अधिकृत एजन्सी आहे. एनसीएसने प्रसिद्ध केलेल्या भूकंप प्रवण क्षेत्राच्या नकाशात, नागपूर क्षेत्र भूकंपासाठी कमी संवेदनाक्षम असलेल्या झोन अंतर्गत येते.
मोठ्या भूकंपांपासून नागपूर क्षेत्र हे तुलनेने सुरक्षित मानले जात असले तरी या भागात छोटे भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याआधीही भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (भाभूस) संस्थेने भूकंपांबाबत वेळोवेळी अभ्यास करून अहवाल जारी केले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य क्षेत्र या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. स्थानिक प्रशासनाच्या विनंतीवरून, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य क्षेत्राच्या आगामी क्षेत्रीय कार्यक्रमांमध्ये नागपूर क्षेत्रीय तपास होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे येत्या काळात भूगर्भशास्त्रज्ञ सविस्तर अभ्यास करून या तुरळक भूकंपाची कारणे शोधण्याचा प्रयत्न करतील. भाभूस, मध्य क्षेत्रातील भूकंप भूविज्ञान विभागातील शास्त्रज्ञ या भूकंपांचे मॅपिंग आणि संवेदनशीलता यावर सतत काम करत आहेत. यापूर्वी नागपूरमध्ये फेब्रुवारी २०२४ ते एप्रिल २०२४ दरम्यान अशा प्रकारच्या ६ घटनांची नोंद झाली आहे हे विशेष.