Randhir Savarkar : टीईटी परीक्षेतील गैरव्यवहाराकडे आमदार रणधीर सावरकरांनी वेधले लक्ष | पुढारी

Randhir Savarkar : टीईटी परीक्षेतील गैरव्यवहाराकडे आमदार रणधीर सावरकरांनी वेधले लक्ष

अकोला, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत आज (गुरुवार) विधानसभेत अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर (Randhir Savarkar) यांनी प्रश्न उपस्थित करून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांना खुलासा करण्यासंदर्भात विचारणा केली.

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा सन २०१९-२० मध्ये गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात आल्यानंतर या प्रकरणात शिक्षण परिषदेचे आयुक्त, शिक्षण विभागाचे तांत्रिक सल्लागार, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी कंपनीचा सल्लागार, माजी संचालक तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त यांच्या सह ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाच्या प्राथमिक तपासात १६ हजार ७०५ उमेदवारांपैकी ७८८० अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेण्यात आल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. बनावट शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांच्या आधारे अनेक शिक्षक सध्या कार्यरत असल्याने शिक्षकांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत असून सर्व शिक्षकांच्या सेवा समाप्त करुन त्या जागा पात्र उमेदवारांना देण्यात याव्यात व नव्याने उपलब्ध होणा-या जागा शिक्षक भरतीत समाविष्ट करण्यात याव्यात अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनने शासनाकडे केली होती.

याशिवाय टाटा सल्लागार सेवा (टीसीएस) सारख्या जगविख्यात कंपनीला निविदा प्रक्रियेतून वगळून काळ्या यादीतील कंपन्यांना काम देण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी पकडलेली शेवटची साखळी असल्याने घोटाळ्यातील खरे सूत्रधार महाआयटीचे आजी-माजी संचालक, अधिकारी व आयटी विभागाशी संबंधित मंत्री असून त्यांची चौकशी केली आहे काय ? चौकशीनुसार संबंधित टाटा सल्लागार सेवा (टीसीएस) व शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील दोषींविरुद्ध कारवाई करण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली. याबाबत आमदार सावरकर (Randhir Savarkar) यांनी विचारणा केली.

यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले की, याबाबत सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्हयामध्ये ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात १६ हजार ७०५ उमेदवारांपैकी ७८८० अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांचेकडून सदर ७८८० अपात्र उमेदवारांबाबत अभिलेख तपासण्यात आले आहेत. तसेच टाटा सल्लागार सेवा सारख्या विख्यात कंपनीला निविदा प्रक्रियातून वगळून काळ्या यादीतील कंपनीला काम देण्यात आले असल्याचे त्यांनी अमान्य केले.

याबाबत सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे दाखल दोन गुन्हयांचा पुढील तपास सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर यांचेकडून सुरु आहे. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये (टीईटी) झालेल्या गंभीर अनियमितता प्रकरणी सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल, असेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचलंत ? 

पहा व्हिडिओ : घरातल्‍यांचा जुगनू, कॉमेडीयन आणि ‘आप’चा भगवंत | Bhgavant Mann | Aap CM Candidate

Back to top button