

चंदीगड : पंकज मिश्रा
निवडणुकीपूर्वी खेळलेल्या दलित कॉर्डमुळे जाट-शीखांची नाराजी, अंतर्गत गटबाजी आणि पराभवांच्या शक्यतांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पंजाबमध्ये आतापर्यंत मुख्य विरोधी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने त्यांच्या 'झाडू'ने कॉंग्रेसचा पराभव करीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.एवढच नाही, तर काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा भदौर आणि चमकोर साहिब या दोन्ही जागांवर पराभव झाला. कॅप्टन अमरिंदर सिंह पटियालातून,अमृतसर (पूर्व) विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू, लंबी विधानसभा मतदार संघातून प्रकाश सिंह बादल आणि जलालाबाद मतदार संघातून सुखबीर सिंह बदल पराभूत झाले.
दिल्लीतील विकास कामांचा डंका वाजवत पंजाबमध्ये प्रवेश केलेल्या आम आदमी पक्षाने अवघ्या ८ वर्षांमध्येच सत्ता काबीज केली. गतवर्षी झालेल्या चंदीगढ महानगरपालिका निवडणुकीपासून बदलाचे वारे वाहू लागले होते. 'आप'ने पालिका निवडणुकीत पहिल्यांदा सहभागी होत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. कॉंग्रेसच्या चुकांदेखील त्यासाठी कारणीभूत होत्या.
राज्यात जाट शीखांचे प्राबल्य आहे. कॉंग्रेसने २०१७ मध्ये जाट-शीख चेहरा कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री बनवले होते. मात्र निवडणुकीपूर्वी त्यांना हटवून पक्षाने राज्याला पहिला दलित मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या रूपात दिला. कॉंग्रेसच्या या 'दलित कॉर्ड'मुळे जाट-शीख नाराज झाले शिवाय अंतर्गत गटबाजी देखील उफाळून आली. चन्नी बरेच सक्रिय असल्याने त्यांचे प्रस्थ वाढल्यास राजकारण संपेल अशी भीती जाट-शीखांना वाटत होती, असा एक मतप्रवाह होता. आम आदमी पक्षाने मात्र २०१७ च्या चुकीपासून बोध घेत यंदा योग्य वेळेवर मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केले.
सर्वसामान्यांचे लक्ष वेधणारे आश्वासने आपकडून निवडणुकीदरम्यान देण्यात आली. त्यामुळेच कॉंग्रेस आणि अकाली दलाऐवजी जाट-शीखांनी 'आम आदमी पक्षा'वर विश्वास दाखवला. सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाची यंदाच्या निवडणुकीत इतिहासातील आतापर्यंत सर्वात वाईट कामगिरी दिसून आली.
निवडणुकीच्या निकालानंतर जाती-पातीचे राजकारण मागे सारत पंजाबवासियांनी 'कॉमन मॅन' अशी ओळख असलेल्या 'आप' ला डोक्यावर घेतल्याचे स्पष्ट होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शब्दावर मतदारांनी भगवंत मान यांना संधी दिली. मान जवळपास ५८ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. केंद्रात गेल्या ७ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपला दिल्लीच्या सत्तेपासून दूर ठेवणारे अरविंद केजरीवाल यांची प्रतिमाच पंजाबमध्ये पक्षाला मुख्य विरोधी पक्षापासून सत्ताधारी बाकापर्यंत घेवून गेली आहे. पक्षाने २०१७ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आपने २० जागा मिळवत मुख्य विरोधी पक्षाचा मान मिळवला होता.
गेल्या पाच वर्षांत राजधानी दिल्लीत शिक्षण,आरोग्य आणि नि:शुल्क पाणी,वीज क्षेत्रात आम आदमी पक्षाने राबवलेले 'मॉडेल' किती प्रभावी आहे, हे पंजाबमधील मतदारांपर्यंत पोहचवण्यात आप जवळपास यशस्वी ठरली. शिरोमणी अकाली दल, कॉंग्रेस तसेच भाजपयुतीला नाकारत पंजाबवासियांनी आपला विकासासाठीचा एक नवीन पर्याय म्हणून संधी दिली. या विजयामुळे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान आणखी बळकट झाले आहे. फुटीरतावादी अशी प्रतिमा उभी करून इच्छिणाऱ्यांना केजरीवाल 'देशभक्त' असल्याचे मतदारांनी निकालातून दाखवून दिले आहे.
आप चा विजय अनेक अनुषंगाने महत्वाचा आहे.पाकिस्तानच्या शेजारील राज्य असल्याने पंजाबमधील सीमावर्ती भागात अंमली पदार्थाचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. शिवाय वेगळा 'खालिस्तान' सेंटीमेंट काही भागात अद्यापही जिवंत आहे. अशात या समस्येवर तोडगा काढण्याचे मोठे आव्हान सत्ताधारी आप समोर उभे आहे. या मुद्यावर भाजप , कॉंग्रेसने आपला घेरण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मद्यपी आहे, शिवाय केजरीवाल फुटीरतावादी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पंरतु, त्याचा तीळमात्रही प्रभाव झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचलं का