यवतमाळ : शेंबाळपिंपरीत दोन गटात दगडफेक; १५ जखमी | पुढारी

यवतमाळ : शेंबाळपिंपरीत दोन गटात दगडफेक; १५ जखमी

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा

फलक काढण्याच्या कारणातून दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यात १५ जण जखमी झाले असून नियंत्रणासाठी आलेल्या पोलीस वाहनावरही दगडफेक केल्याने वाहनाचे नुकसान झाले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे आज (सोमवार) सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी हे गाव संवेदनशील म्हणूनच ओळखले जाते. प्रभाग क्रमांक एकमध्ये फलक काढण्याच्या कारणातून दोन गट एकमेकांसमोर आल्याने वाद निर्माण झाला. काही वेळातच दोन्ही गटाने परस्परांवर तब्बल तीन ते चार तास तुफान दगडफेक केली. या घटनेत सरपंचासहित १० ते १५ जण गंभीर जखमी झाले. पोलीसांच्या वाहनाचीसुद्धा तोडफोड करण्यात आली.

गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेत परिस्थिती सांभाळली. एसआरपी व दंगल नियंत्रण पथकही दाखल झाले आहे. या घटनेने गावात तणाव निर्माण झाल्याने व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद केली. रस्त्यावर दगडांचा मोठा खच पडला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे, स्थानिक गुन्हे शाखा पुसद उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल आडे व उमरखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी पाडवी गावात तळ ठोकून आहेत.

Back to top button