युपी निवडणुकीत भोजपुरी 'तडका', रवि किशन यांच्‍या भाजप प्रचार गीताला भोजपुरी गायिकेने दिले 'उत्तर' - पुढारी

युपी निवडणुकीत भोजपुरी 'तडका', रवि किशन यांच्‍या भाजप प्रचार गीताला भोजपुरी गायिकेने दिले 'उत्तर'

पुढारी ऑनलाइन डेस्‍क
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे रण आता चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी भाजपची कोंडी करण्‍याबरोबरच आक्रमक प्रचारातही विरोधकांनी आता समांतर ‘चाल’ करण्‍याचे नियोजनही केल्‍याचे दिसत आहे. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी रवि किशन यांच्‍या उपस्‍थितीत ‘यूपी में सब बा’ हे भोजपुरी गाणं रिलीज केलं. याला उत्तर देताना भोजपुरी गायिका नेहा सिंह राठोर हिने ‘मंत्री का बेटुवा …’ या गाण्‍याने उत्तर प्रदेश सरकारवर हल्‍लाबोल केला आहे.

विधानसभा निवडणुकीत भोजपुरी गाण्‍यांची एंट्री

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भोजपुरी गाण्‍यांची एंट्रीही झाली आहे. योगी आदित्‍यनाथ यांनी रवि किशन यांच्‍या उपस्‍थितीत ‘यूपी में सब बा’ हे गाणं रिलीज केलं. यानंतर काही तासांमध्‍ये नेहा राठोड हिने योगी आदित्‍यनाथ सरकारवर हल्‍लाबोल करणारे गाणं रिलीज केले. या गाण्‍यात लखीमपूर खीरी हत्‍याकांड प्रकरण, हाथरस आदी घटनांचा उल्‍लेख आहे. नेहा राठोड हिने यु ट्‍यूब व ट्‍विटरवर हे गाणं पोस्‍ट केले आहे.

‘यूपी में सब बा’ विरुद्‍ध ‘मंत्री का बेटुवा’

सोशल मीडियावर गायक, अभिनेता रवि किशन यांच्‍या ‘यूपी में सब बा’चा टीझर आणि पोस्‍टरची चर्चा होती. या गाण्‍यात भाजप सरकारने मागील पाच वर्षांमध्‍ये केलेल्‍या विकास कामांचा आढावा घेण्‍यात आला आहे. या गाण्‍यात अभिनेता, गायक रवि किशन भगवी वस्‍त्र धारण करत आपल्‍या शैलीत गाताना दिसत आहे. रवि किशन यांचे फॅन मागील काही दिवस या गाण्‍याच्‍या प्रतीक्षेत होते. भाजपचा प्रचार करणार्‍या गाण्‍याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसादही मिळाला;पण काही तासातच नेहा सिंह राठोड हिने ‘मंत्री का बेटुवा हे गाणे रिलीज केले.

या गाण्‍यात भाजप सरकारवर जोरदार प्रहार करण्‍यात आला आहे. कोरोनाच्‍या दुसर्‍या लाटेमध्‍ये रुग्‍णांचे झालेले मृत्‍यू, लखीमपूर खीरीमध्‍ये आंदोलक शेतकर्‍यांची झालेल्‍या हत्‍या आदी घटनांचा उल्‍लेख या गाण्‍यात आहे. विशेष म्‍हणजे, या गाण्‍याचा शेवटही रवि किशन यांच्‍या फेमस डायलॉगने केला आहे.

 

Back to top button