नितीन गडकरी यांना सभेत बोलताना भोवळ | पुढारी

नितीन गडकरी यांना सभेत बोलताना भोवळ

नागपूर ः पुढारी वृत्तसेवा : भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना विदर्भातील कडक उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने प्रचार सभेतच बोलताना भोवळ आल्याची घटना बुधवारी (दि. 24) दुपारी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे घडली. पदाधिकारी, कार्यकर्ते व सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना सावरले. डॉक्टरांनी उपचार केले. यानंतर काही वेळातच त्यांनी पुन्हा उपस्थितांना मार्गदर्शन केले.

26 एप्रिलला होणार्‍या निवडणुकीसाठी पश्चिम विदर्भातील प्रचार तोफा बुधवारी शांत झाल्या. महायुतीच्या शिवसेना उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी जाहीर सभेत मार्गदर्शन करत होते. एकदम गर्दी करू नका, हवा येऊ द्या, असे गडकरी तत्पूर्वी म्हणाले. त्याचवेळी बोलताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि व्यासपीठावरील नेते, पदाधिकारी व सुरक्षा रक्षकांनी सावरत स्टेजच्या मागील बाजूला नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून, ते बोलत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वीदेखील अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.

Back to top button