वाळवा तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध : खा. धैर्यशील माने | पुढारी

वाळवा तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध : खा. धैर्यशील माने

किल्ले मच्छिंद्रगड : येडे मच्छिंद्र ही क्रांतीची भूमी आहे. इथे दिलेला प्रत्येक शब्द हे माझे वचन असून, भविष्यकाळात तालुक्यातील प्रत्येक भागात विकासकामे पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. वाळवा तालुक्याने मताधिक्य देण्याचे आवाहन खा. धैर्यशील माने यांनी केले.

वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथील क्रांतिसिंह पाटील व्यासपीठावरून ते प्रचार सभेत बोलत होते. प्रचार सभेपूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

खा. माने म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील 564 गावांपैकी 450 गावांत विकासकामे सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य कुटुंबातून उदयास आलेले नेतृत्व आहे. सामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले आहे. माझ्या संसदेतील कामाची व भाषणाची माहिती बघायची असेल तर यूट्यूबवर लोकसभेतील भाषणे ऐकावीत.

माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी तरुण, तडफदार व संसदेत अभ्यासूपणे प्रश्न मांडणारा उमेदवार दिला आहे. त्यांना वाळवा, शिराळा तालुक्यांतून भरघोस मतदान देऊन विजयी करूया.

प्रचार सभेस जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, शिवसेनेचे सागर मलगुंडे, रयत क्रांती संघटनेचे सागर खोत, भाजपा तालुकाध्यक्ष निवास पाटील, विक्रम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष केदार भाऊ, शरद पाटील, उपसरपंच सचिन पाटील, रावसाहेब पाटील, विशाल गडदे, संतोष पाटील, गोरखनाथ पाटील, प्रशांत पाटील, आबासो पाटील, सोनू कुलकर्णी, समीर मुल्ला, जयवंत खंडागळे, बबन खंडागळे, सत्यवान शेवाळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button