आ. गोवर्धन शर्मा, "अमरावतीत छत्रपती शिवरायांचा पुतळा पूर्ववत बसवावा" - पुढारी

आ. गोवर्धन शर्मा, "अमरावतीत छत्रपती शिवरायांचा पुतळा पूर्ववत बसवावा"

अकोला, पुढारी वृत्तसेवा : अमरावतीचे आमदार रवि राणा यांनी १२ जानेवारीच्या रात्री अमरावती शहरातील बडनेराकडे जाणाऱ्या राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. हा पुतळा रविवारी १६ जानेवारीरोजी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आला. जेव्हा कर्नाटकामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. तेव्हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी कर्नाटकच्या मुख्यममंत्र्यांचे पुतळे जाळत रोष व्यक्त केला होता.

आता महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला तरीसुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते गप्प का, असा सवाल भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांनी केला आहे. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांच्या इशाऱ्यावर मनपा आयुक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला असल्याचा आरोपही आमदार गोवर्धन शर्मा यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून महाविकास आघाडी सरकारने काय साध्य केले. अमरावतीत कुठेच अतिक्रमण नाही काय, असा सवाल आमदार गोवर्धन शर्मा यांनी उपस्थित केला आहे. तर महाराष्ट्रातील तमाम तेरा कोटी जनतेची आघाडी सरकारने माफी मागावी आणि पुतळा सन्मानाने बसवण्यात यावा, अशी मागणी देखील आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे.

Back to top button