तब्बल 24 हजार हिरे जडवलेली अंगठी! | पुढारी

तब्बल 24 हजार हिरे जडवलेली अंगठी!

नवी दिल्ली : भारतीय लोकांमध्ये, विशेषत: महिलांमध्ये दागिन्यांची जी आवड आहे, ती जगातील इतर कोणत्याही देशातील महिलांमध्ये दिसत नाही. आपल्याकडे नखशिखान्त दागिन्यांनी मढलेल्या स्त्रिया आणि काही पुरुषही आढळतात. याशिवाय हल्ली महिलांमध्ये हिर्‍यांच्या दागिन्यांचीही आवड वाढल्याचे दिसून येते. हिर्‍याचे दागिने प्रत्येकाला परवडणे शक्य नसतात, कारण हिरे खूप महाग असतात. पण, काही लोक हिर्‍याच्या अंगठ्या घालतात. तुम्ही कधी अशी अंगठी पाहिली आहे का जिच्यात 24 हजारांहून अधिक हिरे गुंफलेले असतात? होय, अशा अंगठीने जागतिक विक्रम केलेला आहे. केरळमध्ये बनवलेल्या या खास अंगठीचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलं आहे. या अंगठीला ‘अमी’ असे नाव देण्यात आले आहे, जो एक संस्कृत शब्द आहे.

मशरूमच्या थीमवर ही खास अंगठी तयार करण्यात आली आहे. ती एसडब्ल्यूए डायमंड्सने बनवली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या अंगठीत एकूण 24,679 हिरे दडलेले आहेत आणि याच कारणास्तव तिचे वर्णन जगातील सर्वात ‘डायमंड हर्बल रिंग’ म्हणून केले गेले आहे. या अंगठीचे वजन 340 ग्रॅम आहे. एसडब्ल्यूए डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक अब्दुल गफूर अनादियान यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने या अंगठीची नोंद ‘मोस्ट डायमंड्स सेट इन वन रिंग’ श्रेणीत केली आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही या खास अंगठीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडीओमध्ये अंगठी कशी चमकत आहे हे दिसत आहे. कारण, त्यात फक्त हिरे आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की या छोट्या अंगठीत गुंफलेल्या 24,679 हिर्‍यांची गणना कशी झाली असेल! तर ते मोजण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर करण्यात आला होता. त्यानंतरच त्याचे नाव जागतिक विक्रमात नोंदले गेले. यापूर्वी एका अंगठीत सर्वाधिक हिर्‍यांचा विश्वविक्रम मेरठ येथील ज्वेलर्स हर्षित बन्सलच्या नावावर नोंदवण्यात आला होता. 2020 मध्ये त्यांनी एक अंगठी बनवली होती, ज्यात 12,638 हिरे गुंफण्यात आले होते. झेंडूच्या फुलासारखी दिसत असल्याने या अंगठीला ‘द मेरिगोल्ड’ असे नाव देण्यात आले.

संबंधित बातम्या
Back to top button