Star Pravah : "महिला कलाकारांसोबत किरण मानेंची गैरवर्तवणूक होती" - पुढारी

Star Pravah : "महिला कलाकारांसोबत किरण मानेंची गैरवर्तवणूक होती"

मुंबई, पुढारी ऑनलाईन : ‘मुलगी झाली हो’, या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावरून जोरदार चर्चा सुरू झाल्या. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे, अशाही चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडियावर किरण मानेच्या समर्थानर्थ आणि विरोधात अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यावर स्टार प्रवाह वाहिनीकडून एक निवेदन जाहीर करण्यात आलं आहे. (Star Pravah)

स्टार प्रवाहचं सविस्तर निवेदन असं…

‘मुलगी झाली हो’ या शोमध्ये विलास पाटील यांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक असल्याचे आम्हाला समजले आहे. त्यामुळे अशाप्रकारचे आरोप करणे दुर्देवी आहे.

या मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, माने यांना शोमधून काढून टाकण्याचा निर्णय त्यांनी अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला नायिकेसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे घेतला होता. अनेक सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांचा ते अनादर करायचे. या आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. (Star Pravah)

या तक्रारीनंतर किरण माने यांना अनेकदा समज देण्यात आली होती. पण, माने यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्यांच्या या वागणुकीमुळे सेटवरील शिस्त आणि वातावरण बिघडू लागलं. त्यासोबत सहकलाकारांना, त्यातही महिलांना अवमानकारक वर्तणूक मिळत असल्याने त्यांना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संपूर्ण आदर करतो. पण त्यासोबतच आमच्या कलाकारांना, विशेषतः महिलांना एक सुरक्षित कार्यक्षेत्र देण्यास कटिबद्ध आहोत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे,  असे जाहीर स्पष्टीकरण स्टार प्रवाह वाहिनीतर्फे देण्यात आले आहे.

पहा व्हिडिओ : किरण मानेंना मालिकेतून का काढलं?

Back to top button