बीड : भरधाव मोटारीची बाभळीच्या झाडाला धडक; २ जण जागीच ठार, एक जखमी - पुढारी

बीड : भरधाव मोटारीची बाभळीच्या झाडाला धडक; २ जण जागीच ठार, एक जखमी

धारूर (बीड) ; पुढारी वृत्‍तसेवा

परळीकडून भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीची बाभळीच्या झाडाला जोरात धडक बसुन भीषण अपघात झाला. या अपघातात दोनजण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (रविवार) दुपारी तेलगाव येथे तेलगाव-परळी महामार्गावर घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, यात गाडीचा पूर्ण चक्काचुर झाला. मृत व जखमींना जेसीबीच्या सहायाने बाहेर काढण्यात आले.

यासंदर्भात माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरूण रविवारी एम. एच.१३ सीके ०४४१ या स्विफ्ट डिझायर गाडीने भोकर येथुन तेलगाव मार्गे बीडला जात होते. तेलगाव येथे परळी रोडवर असलेल्या अमर बिअरबार जवळ गाडी आली असता, चालकाचे स्टेरिंगवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रोडच्या लगत खड्यात असलेल्या बाभळीच्या झाडाला जाऊन धडकली.

या अपघातात चालक व चालकाच्या बाजूच्या सिटवर बसलेला तरूण जागीच ठार झाला. मागच्या सिटवर बसलेला तरूण समोरच्या व मागच्या सिटमध्ये अडकला. मृत व जखमी भोकरचे असुन, अजु ओळख पटलेली नाही. तरीही त्या तरूणांच्या मोबाईलवर आलेल्या फोनच्या अंदाजावरून मृतात युनुस शेख व सचिन मोकमपल्ले यांचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवला जात असुन अमोल वाघमारे हा तरूण गंभीर जखमी झाल्याचे समजते.

गावालगतच अपघात झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु ते बाहेर काढता येथ नव्हते. त्यामुळे गॅस वेल्डिंगने वेल्डिंग करून, एका मृतास बाहेर काढले. तर जखमी व अन्य एका मृतास जेसीबीच्या सहायाने पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाहेर काढले. यानंतर मृत व जखमींना १०८ रूग्ण वाहिकेने रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड तसेच जेसीबी मालक मच्छिंद्र माने तसेच शेकडो नागरिकांनी माणुसकी दाखवत गाडीतील मृत व जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यामुळे एका जखमी तरूणाचा जीव वाचला.

Back to top button