Lok Sabha Election 2024 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात 54 भरारी पथके; शासकीय यंत्रणा सज्ज | पुढारी

Lok Sabha Election 2024 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात 54 भरारी पथके; शासकीय यंत्रणा सज्ज

भिवंडी : पुढारी वृत्तसेवा : भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, अचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा निहाय नऊ असे 54 भरारी पथके 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे. ते भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे व जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते. ( Lok Sabha Election 2024 )

संबंधित बातम्या 

भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाणार असून तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. चार मे रोजी उमेदवारी अर्ज यांची छाननी होऊन सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर या मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार असून चार जून रोजी मतमोजणी भिवंडी तालुक्यातील सावद येथील प्रशस्त गोदामात आयोजित करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन संरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम सुद्धा बनवण्यात येणार आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 लाख 39 हजार 449 मतदार यांची नोंद करण्यात आलेली असून येत्या तीन मे पर्यंत मतदार नाव नोंदणीची मुभा असल्यानं ही मतदार संख्या अजूनही वाढणार आहे. या मतदारांमध्ये 85 वर्षांवरील 20272 व दिव्यांग असलेले 9053 असे एकूण 29325 मतदारांची नोंद असून या निवडणुकीत प्रथमच 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व 40 टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या नागरिकांना टपाला द्वारे मातदान करण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकीसाठी 2189 मतदान केंद्र असणार असून यामध्ये मुरबाड विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक 511 मतदान केंद्र आहेत.

शंभर मिनिटांमध्ये तक्रारीचे निराकरण

निवडणुकी संदर्भातील तक्रारी करण्यासाठी, उमेदवारांच्या मालमत्ता व गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळवण्यासाठी, मतदाराला आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे तपासण्यांसाठी तसेच अमली पदार्थ, शस्त्र, पैसा, दारू यांची माहिती देण्यासाठी व उमेदवारांना प्रथमच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा विविध अ‍ॅप विकसित करण्यात आलेले आहे. तक्रारी संदर्भातील अ‍ॅपवर ऑनलाईन तक्रार केल्यानंतर त्याचे निराकरण पुढील शंभर मिनिटांमध्ये करून तशी माहिती निवडणूक प्रक्रिये मार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या निवडणुकीत उमेदवारास निवडणूक खर्च मर्यादा ही 95 लाख रुपये करण्यात आलेली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.

नियंत्रण कक्ष सुरू

निवडणूक कालावधीमध्ये विविध तक्रारी संदर्भात मुख्य निवडणूक कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून त्या साठी टोल फ्री क्रमांक 18002331114 हा सुरू करण्यात आला असून तो 24 तास सुरू राहणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत 2019 मध्ये भिवंडी लोकसभेतील मतदानाची टक्केवारी ही कमी होती या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढीसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम हे या कालावधीत सुरू राहणार असून समाजाने सुद्धा मतदान प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी शेवटी केले आहे. ( Lok Sabha Election 2024 )

Back to top button