आवाज देऊनही न ऐकल्याने केली हत्या; दोन टोळ्यांतील रक्तरंजित राड्यात एकाचा खात्मा | पुढारी

आवाज देऊनही न ऐकल्याने केली हत्या; दोन टोळ्यांतील रक्तरंजित राड्यात एकाचा खात्मा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा :  कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या चेतना ते आडीवली परिसरात दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजीत राड्यात झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तरूणांच्या दोन टोळ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा जागीच खात्मा झाला असून तीन जण जबर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तपास चक्रांना वेग देऊन दोन्ही टोळ्यांतील काही तरूणांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या 

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या जय मल्हार हॉटेलसमोर काही तरुण उभे होते. याच दरम्यान प्रेम भोवाड नामक तरुण त्याचे मित्र यश गुप्ता आणि राहूल केणे यांच्यासोबत जात होता. या तिघांना जनकल्याण खाजगी हॉस्पिटलमध्ये जायचे होते. जय मल्हार हॉटेलसमोर उभ्या असलेल्या तरुणांच्या टोळक्याने या तिघांना थांबण्यास सांगितले. परंतु ते तिघेही न थांबता थेट हॉस्पिटलकडे गेले. हॉस्पिटलमधून निघून हे तिघे पुन्हा त्याच रस्त्याने परतत होते. या तिघांना पाहून बांधकाम व्यावसायिक असलेल्या योगेश पटेल याने त्याचा मित्र राहूल पाठक आणि संतोष यादव यांच्या मदतीने प्रेम आणि यश या दोघांवर हल्ला चढविला.

योगेश पटेल आणि त्याचे साथीदार सशस्त्र असल्याचे पाहून त्यांनी माघार घेतली. यश हा कसाबसा टोळक्याच्या तावडीतून निसटला आणि जीव वाचविण्यासाठी त्याने थेट घर गाठले.योगेश पटेल याने त्याच्या साथीदारांसह यश गुप्ताचे घर गाठले. घरासमोरच योगेशने कमरेला खोचलेला सुरा काढून यशच्या छातीत खुपसला. हे पाहून यशचा भाऊ जिगर हा मधे पडला असता त्याच्या मानेवर हल्लेखोरांनी वार केले. या हल्ल्यात जिगर गंभीर जखमी झाला. तर यश गुप्ता हा कोसळला आणि रक्ताच्या थारोळ्यात तडफडत ठार झाला. मुख्य सुत्रधार योगेश पटेल आणि त्याचा साथीदार संतोष यादव हे दोघे देखिल जखमी झाले.

घरासमोरच पाडला मुडदा

सशस्त्र टोळक्यांकडून सर्वसामान्यांनाही उपद्रव वारंवार होणार्‍या हिंसक घटनांमुळे चेतना ते आडीवली परिसर वादग्रस्त तथा बदनाम ठरला आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी सशस्त्र टोळक्यांची दहशत असते. रात्री भररस्त्यात या टोळक्यांचा धिंगाणा सुरु असतो. अनेकदा तर दारूच्या नशेत या टोळक्यांकडून रस्त्याने ये-जा करणार्‍या सर्वसामान्यांना मारहाण देखिल करण्यात येते. अशा अनेक घटनांमुळे परिसरातील रहिवासी आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री-अपरात्री दहशत पसरवणार्‍या अशा टोळक्यांवर पोलिसांनी प्रतिबंधकात्मक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी होतेय.

Back to top button