शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना; भाजप नेत्यांची भेट घेण्याची शक्यता | पुढारी

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना; भाजप नेत्यांची भेट घेण्याची शक्यता

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये निर्माण झालेला तेढ, शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले सूतोवाच आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुरू असलेली लगबग या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दिल्लीतील भाजप नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खासदार शिंदे हे खासगी कामानिमित्त दिल्लीला गेले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी म्हटले आहे.

‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ ही शिवसेनेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत मंगळवारी असलेला कोल्हापूरचा दौरा रद्द केला. विरोधक आणि भाजपच्या काही नेत्यांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत. दुसरीकडे कल्याण आणि ठाणे लोकसभेवर भाजपने दावा ठोकून खासदार शिंदे यांचे काम न करण्याचा ठराव केला. त्यानंतर डॉ. शिंदे यांनी काही भाजपचे नेते युतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करीत असून मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कल्याण लोकसभेची जागा सोडून भाजपच्या उमेदवाराच काम करण्याची भूमिका जाहीर करून भाजप नेत्यांना कोंडीत पकडले आहे. त्यात राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत आहेत. शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज खासदार डॉ. शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button