खंडपीठासाठी मुख्य न्यायमूर्तींना भेटणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

खंडपीठासाठी मुख्य न्यायमूर्तींना भेटणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींची तत्काळ भेट घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करण्यासह कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारच्या वतीने येथे तपोवन मैदानावर आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

विकासाच्या कामात गेली अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारने निर्माण केलेले ब्रेक आणि स्पीड ब्रेकर आम्ही हटवून विकासाला चालना दिल्याचे सांगून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.

कोल्हापूरच्या मातीत काहीतरी वेगळे करण्याची धमक असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, संकट कसलंही येवो. मग ते पूर असेल, महापूर असेल किंवा अतिवृष्टी असेल; कोल्हापूरकर नेहमीच धाडसी बाणा दाखवत संकटास सामोरे जातात.

कोल्हापूर-मुंबई हे अंतर लांब आहे. शासकीय कामासाठी सर्वसामान्यांना हेलपाटे मारावे लागू नये म्हणून आपण व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या हिताच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचा हा उपक्रम सुरू केला. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत एक थेंबही पाणी अडविण्याचे नियोजन केले नाही. मात्र आमच्या सरकारने सिंचनाचे 29 प्रकल्प मंजूर केले. त्यातून पाच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. ‘लेक लाडकी लखपती’ योजनेतून मुलीला 18 व्या वर्षी एक लाख रुपये मिळणार आहेत. शेतकर्‍यांसाठी केंद्राप्रमाणे राज्य सरकारने सहा हजार रुपये देत आहे. नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांचे अनुदान आमच्या सरकारने दिल्याचे सांगून हे संपूर्ण श्रेय मोदी सरकारचे असल्याचे शिंदे म्हणाले.

कोल्हापूरची जनता कोणत्याही कामासाठी नेहमीच आग्रही असते. टोलसाठी मोठे आंदोलन झाले. त्यावेळी धाडसी निर्णय घेऊन एका बैठकीतच कोल्हापूरचा टोल बंद करुन कंपनीला 473 कोटी रुपये देण्याची हिंमत याच एकनाथ शिंदे यांनी दाखविल्याचे सांगून शिंदे म्हणाले, गेल्या 11 महिन्यांत विविध खात्यांतून कोल्हापूरच्या विकासासाठी 762 कोटी रुपये दिले आहेत.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार सर्वश्री संजय मंडलिक, धैर्यशील माने व धनंजय महाडिक, आ. भारत गोगावले, आ. प्रकाश आवाडे, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, राजेखान जमादार, रवींद्र माने, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, राहुल आवाडे, वीरेंद्र मंडलिक उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आभार मानले. कागल येथील सादीक आणि फरदीन मकुभाई यांनी नवजात मुलीच्या उपचारासाठी दिलेल्या मदतीबद्दल शिंदे यांचे आभार मानले.

जयपूरच्या धर्तीवर कोल्हापुरचा पर्यटन विकास करा

जयपूर सारखेच कोल्हापुरही सुंदर आहे. मात्र आजवर पर्यटनाच्या दृष्टीने त्याकडे पाहीले नाही. कोल्हापुर जयपूरसारखे विकसीत करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केली. महापालिकेच्या नवीन मुख्य इमारतीसाठीचा 160 कोटींचा प्रस्ताव मंजूर करा, अंबाबाई मंदीर परिसराचा विकासाला निधी द्या आदी मागण्याही त्यांनी केल्या.

औद्योगिक वसाहतींचा विस्तार

कोल्हापुरातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी औद्योगिक वसाहतींचा विस्तार करु असे सांगुन उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, तालुक्याच्या ठिकाणीही औद्योगिक वसाहती स्थापन करून तेथे लघु उद्योगासाठी जागा राखीव ठेवण्यात येतील.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विकासाच्या अनेक अभिनव योजना शिंदे यांनी सुरु केल्या आहेत. त्याचबरोबरच या योजना तळागाळातील लोकांर्यंत पोहचण्यासाठी अंमलबजावणीवरही भर दिला आहे.

लोकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे योगदान असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

शिष्यवृत्तीपासून ड्रोनपर्यत मदतीचे वाटप

शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मदतीचे धनादेश देण्यात आले. यामध्ये वीरपत्नी सुवर्णा कदम यांना दोन हेक्टर जमीनीचा आदेश देण्यासह ड्रोन खरेदीसह विविध उद्योग आणि उपक्रमांना मदतीचे धनादेश देण्यात आले. जिल्ह्यात शासनाच्या योजनांचे एक लाख 58 हजार 237 लाभार्थी असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.

Back to top button