डोंबिवली : रुग्णवाहिका चालकास फेरीवाल्यांकडून बेदम मारहाण | पुढारी

डोंबिवली : रुग्णवाहिका चालकास फेरीवाल्यांकडून बेदम मारहाण

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांनी अधिकाऱ्यांची बोटं छाटल्याचे प्रकरण ताजे असतानाच डोंबिवली पूर्व येथे फेरीवाल्यांनी रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत रुग्णवाहिका चालक जखमी झाला असून यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीस वर्षीय गणेश माळी हा डोंबिवली पूर्वेतील पूजा मधुबन चित्रपट गृहासमोर असणाऱ्या एका खाजगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतो. याच रुग्णालयाच्या रस्त्यावर आजूबाजूला अनेक फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. फूटपाथला लागूनच हे फेरीवाले बसत असल्याने काही कडापे त्यांनी या ठिकाणी ठेवले आहेत. गुरुवारी (दि. १६) दुपारी रुग्णवाहिका घेऊन जाण्यासाठी चालक रुग्णवाहिका फिरवून घेत असताना फुटपाथवर ठेवलेल्या एका कडाप्याला रुग्णवाहिकेचा धक्का लागला. यामुळे येथे बसणारे फेरीवाले रुग्णवाहिका चालकाला जाब विचारण्यासाठी आले आणि त्याच्याशी बाचाबाची करू लागले. बाचाबाची करताना संतप्त झालेले या फेरीवाल्यांनी रुग्ण वाहिका चालकाला बेदम मारहाण केली. यामुळे हा रुग्णवाहिका चालक जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. या संदर्भात त्याने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास रामनगर पोलीस करत आहेत.

Back to top button