वीटभट्टी कामगारांची 1 हजार मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात | पुढारी

वीटभट्टी कामगारांची 1 हजार मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  स्थलांतरित वीटभट्टी कामगारांची मुले पालकांच्या व्यवसायामुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे मिशन ब्रिक टू इंक हाती घेतले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. डोअर स्टेप स्कूल फाऊंडेशन आणि ठाणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर तालुक्यातील 107 वीटभट्टीवरील सर्वेेक्षण करण्यात आले. तेथे 0 ते 16 वयोगटातील 1 हजार 12 बालके आढळून आली. या बालकांना त्यांच्या वयोमानानुसार अंगणवाडी आणि शाळांमध्ये प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यात यश आले आहे.

दरवर्षी जिल्ह्यातील वीटभट्टी कामगार मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होत असतात. त्यामुळे या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता असते. यामुळे बालमजुरीचे प्रमाणही वाढू शकते. यासाठी कामगारांच्या हंगामी स्थलांतरित विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने उपाययोजना आखल्या आहेत. वीटभट्टीवर काम करीत असलेल्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी करावयाच्या उपाय योजनेबाबत जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामपंचायतस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.

गठित समितीद्वारे वीट भट्ट्यांवरील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करणे, कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करणे, शाळेत मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, मुलांचे लेखन, वाचन, आकलन वाढेल याकडे लक्ष देणे व त्यांची उपस्थिती वाढवून आयसीडीएस विभागाच्या सोई-सुविधा देणे, 6 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांची अंगणवाडीत नोंदणी करणे, मुलांना गणवेश, पुस्तक, आरोग्यसेवा, आहार यासाठी प्रयत्न करणे, स्वंयसेवी संस्थाची मदत मिळण्याकरीता प्रयत्न करणे यासारखी कामे हाती घेण्यात आली आहेत.

ठाणे जिल्ह्यातील वीटभट्टीवर काम करणार्‍या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘ब्रीक टू इंक’ या मोहिमेद्वारे कुटुंबाचे समुपदेशन करून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात मुलांना आणण्यात येत आहे. असे असले तरी शहापूर तालुक्यातील सापगाव येथील वीट्टभट्टी व शाळा हे अंतर लांब असल्याने व रस्ता ओलांडून मुलांना शाळेत जावे लागत असल्यामुळे अनेकदा पालक शाळेत मुलांना पाठविण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे अनेकदा पालक बालकांना शाळेत पाठवत नसल्याची सबब समोर आली आहे. त्यामुळे या वीटभट्टीवरील बालकांचे शिक्षणातील सातत्य टिकून ठेवण्यासाठी येथील शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शहापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जी बालके आढळून आली आहेत, त्या बालकांच्या शिक्षण, आरोग्य, पोषण आहाराची काळजी घेतली जात आहे. तसेच डोअर स्टेप स्कूल फाऊंडेशन आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या बालकांना प्राथमिक शिक्षण देण्यात येत आहे. तसेच पुढील वर्षी वीटभट्टीवर मजुरीसाठी येणार्‍या मजुरांच्या बालकांच्या शिक्षणाचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे.
– मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

Back to top button