ठाणे : पहिल्या प्रियकराने केली दुसऱ्या प्रियकराची भर रस्त्यात हत्या | पुढारी

ठाणे : पहिल्या प्रियकराने केली दुसऱ्या प्रियकराची भर रस्त्यात हत्या

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  कल्याणच्या खडेगोळवली भाजी मार्केटमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास रक्तरंजित थरारक घटना घडली. मैत्रिणीच्या समक्ष तिच्या मित्राचा खात्मा करण्यात आला. या घटनेची प्रत्यक्षदर्शी असेलल्या तरूणीशी प्रेमसंबंध तोडल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने मुंबईकर असलेल्या या तरुणाचा चाकूने सपासप वार करून कायमचा काटा काढला. आदित्य सुरेश बर (२२) असे मृत तरुणाचे नाव असून तो मुंबईतल्या मानखुर्द-गोवंडी परिसरात राहणारा आहे. या संदर्भात दिव्यात राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीने दिलेल्या जबानीवरून कोळसेवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यापासून अवघ्या काही तासांतच एका संशयिताला ताब्यात घेतले.

आदित्य हा त्याच्या मैत्रिणीसोबत कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात राहणारा ललित उज्जैनकर (२२) याच्याकडे असलेले हनी नावाचे कुत्र्याचे पिल्ल घेण्यासाठी गोवंडीहून कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात शनिवारी रात्री आला होता. तेथील म्हात्रे कन्स्ट्रक्शन ऑफीसच्या समोर आदित्य आणि त्याची मैत्रीण हे दोघे उभे होते. ललित हा त्याच्या सागर, रोहित व नकुल (सर्व रा. खडेगोळवली) यांच्यासह तेथे आला. काही कळायच्या आतच त्यांच्यापैकी रोहित, सागर आणि नकुल या तिघांनी आदित्यचे हात-पाय पकडून त्याला लाथा- बुक्यांनी मारहाण केली. तर ललित याने कमरेला खोचलेला धारदार चाकू काढून आदित्यच्या छातीवर सपासप वार करून हल्लेखोर ललित आणि त्याच्या साथीदारांनी तेथून पळ काढला. रस्त्यावरील लोकांनी धाव घेऊन जखमी आदित्यला जखमी अवस्थेत असलेल्या आदित्यला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. तथापी तेथील डॉक्टरांनी तपासून आदित्यला मृत्यू घोषित केले. याच दरम्यान पोलिसांनी एका संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.

आरोपी संधीचीच वाट पाहत होता

यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या तक्रारदार तरुणीचे पूर्वी या हत्याकांडातील मुख्य आरोपी ललित उज्जैनकर याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र या तरूणीने काही कारणास्तव ललितशी प्रेमसंबंध तोडले आणि आदित्य बर याच्याशी मैत्रीचे संबंध जोडले होते. हे कळल्यानंतर ललित खवळला होता. तो संधीची जणू वाट पाहत होता.

Back to top button