ठाणे : वालधुनी नदीत रात्रीस खेळ चाले! | पुढारी

ठाणे : वालधुनी नदीत रात्रीस खेळ चाले!

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  सामाजिक कार्यकर्ते तथा वालधुनी नदीमित्र पियुष वाघेला, नरेश साळवे, सत्यजित बर्मन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी शनिवारी मध्यरात्री 1.40 च्या सुमारास सिड सारखे घातक व विषारी केमिकल
वालधुनी नदीत सोडणार्‍या टँकरला जागीच रोखले. या नदीत 26 हजार 370 किलो वजनाचे घातक केमिकल
सोडण्याचा प्रयत्न करणार्‍या टँकर चालकासह जेथून हे केमिकल आणले त्या कंपनीच्या मालकावर गुन्हा
दाखल करण्यात आला असून महात्मा फुले चौक पोलिसांनी टँकर जप्त करून चालकाला अटक केली आहे.

कल्याणजवळच्या शांतीनगर येथे वालधुनी पुलावरून नदीत केमिकल सोडण्यासाठी एम एच 05/ ए एम/3059 क्रमांकाचा टँकर मध्यरात्री 1 वाजून 40 मिनिटांनी दाखल झाला. या टँकरला जोडलेला पाईप वालधुनी नदीत सोडण्यात येत होता. हा प्रकार पाहणार्‍या नदीमित्र पियुष वाघेला यांना संशय आला. त्यांनी आपल्या सहकार्‍यांना घटनास्थळी बोलावून घेतले. या सर्वांनी चौकशी केली असता सदर टँकरमधून नदीत केमिकल सोडण्याचा चालक प्रयत्न करत होता. नदीमित्र वाघेला यांनी तात्काळ टँकरला जोडलेला पाईप काढून टाकला आणि महात्मा फुले चौक
पोलिसांना माहिती दिली.

पोलीस येईपर्यंत नदीमित्र पियुष वाघेला, नरेश साळवे, सत्यजित बर्मन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी टँकर आणि चालकाला पकडून ठेवले होते. नदी मित्रांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनाही याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चालकाला ताब्यात घेतले. एमपीसीबीच्या अधिकार्‍यांनी पहाटे 3.30 वाजता घटनास्थळ गाठले. एमपीसीबीचे अधिकारी बाबासाहेब कुकडे यांनी केलेल्या तपासणीत टँकरमध्ये 26370 किलो वजनाचे
हायड्रोक्लोराईट हे पांढर्‍या रंगाचे केमिकल आढळले. हे केमिकल मानव व जलचरांसाठी हानिकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे केमिकल पाईपद्वारे वालधुनी नदीत सोडणार्‍या टँकर चालक नजर मोहम्मद समी मुल्ला अन्सारी याची एमपीसीबीचे अधिकारी बाबासाहेब कुकडे यांनी चौकशी केली. हे टँकर पालघर जिल्ह्यातील भिवंडी-वाडा रोडला असलेल्या दोधिया केमटेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून आणल्याचे निष्पन्न झाले. घातक केमिकल सोडण्याचा प्रयत्न करणार्‍या टँकर चालकाला रंगेहाथ पकडण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा या नदीतील
जीवसृष्टी नष्ट झाली असती. नदी मित्रांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Back to top button